परभणी : खुर्लेवाडी शिवारातून वाळूचा अवैध उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 12:05 AM2019-05-06T00:05:54+5:302019-05-06T00:06:13+5:30
तालुक्यातील खुर्लेवाडी शिवारामधून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा रात्रभर केला जात आहे. महसूल प्रशासनाने उपाय योजना करूनही वाळूचोरी थांबलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी) : तालुक्यातील खुर्लेवाडी शिवारामधून गोदावरी नदीच्या पात्रातील वाळूचा अवैध उपसा रात्रभर केला जात आहे. महसूल प्रशासनाने उपाय योजना करूनही वाळूचोरी थांबलेली नाही. त्यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे.
पालम तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र जागोजागी कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे मागील महिनाभरापासून वाळू चोरांनी धुमाकूळ घातला आहे. जिल्हाधिकारी पी.शिवशंकर हे निवडणुकीच्या कामातून मोकळे होताच कारवाईचा धडाका सुरू केला. त्यामुळे काही काळ वाळू माफिया शांत झाले होते. गोदावरी नदीच्या पात्रातून येणारे रस्ते महसूल विभागाच्या वतीने जेसीबीने खोदून जागोजागी खड्डे करण्यात आले होते. त्यामुळे वाळू चोरणारी वाहने पात्रात उतरणे कठीण होताना पहावयास मिळाले. खुर्लेवाडी शिवारामध्ये मात्र महसूल विभागाने खोदलेले खड्डे भरून टाकले आहेत. या रस्त्याचा सर्रासपणे अवैध उपसा करण्यासाठी वापर केला जात आहे. रात्रभर जागरण करून २५ ते ३० ट्रॅक्टर अवैधपणे वाळूचा सर्रासपणे अवैध उपसा करीत आहेत.
खुर्लेवाडीकडे येणाऱ्या रस्त्यावर जागोजागी रात्रभर माहिती ठेवली जात असून नवीन दुचाकी किंवा चारचाकी वाहने गोदावरीकडे येताच पात्रात अवैध वाळुची वाहतूक करणारी वाहने आजूबाजूच्या शेतात लपवली जात आहेत. हे गाव तालुक्यापासून दूर अंतरावर असल्याने वाळू चोरांना रान मोकळे झाले आहे. रात्रभर येथील वाळूचा उपसा करून त्याची रातोरात विक्री केली जात आहे. अनेकदा वाळू उपशासाठी जेसीबीचा वापरही केला जातो. त्यामुळे शासनाला लाखो रुपयांचा फटका बसत असून खुर्लेवाडी परिसरात वाळू चोरटे सक्रीय झालेले आहेत. आजूबाजूच्या परिसरात ग्रामस्थांनी वाळू चोरी बंद पाडल्याने चोरांनी आपला मोर्चा खुर्लेवाडीकडे वळविला आहे. गोदावरीच्या पात्रात रात्रभर वाहनांचा वापर वाढला आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन अवैध वाळू उपसा थांबवावा, अशी मागणी होत आहे.
उपाययोजना करूनही वाळू उपसा थांबेना
च्पालम तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने दंडात्मक कारवाई, रस्त्यावर जेसीबीने खोदकाम आदी उपाययोजना राबवूनही अवैध वाळू उपसा काही केल्या थांबेनासा झाला आहे.
च्त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन खुर्लेवाडी व शिवारातून होणारा अवैध वाळू उपसा त्वरित थांबवावा, अशी मागणी गोदावरी नदीकाठावरील ग्रामस्थांमधून होत आहे.