परभणी : सव्वा लाख बालकांचे केले लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:01 AM2018-12-10T01:01:50+5:302018-12-10T01:03:23+5:30
गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ११ दिवसांमध्ये १ लाख ३४ हजार ३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट प्रशासनाने गाठले असून, आणखी एक महिना ही मोहीम राबविली जाणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : गोवर, रुबेला आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेंतर्गत ११ दिवसांमध्ये १ लाख ३४ हजार ३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे़ उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत ७५ टक्के उद्दिष्ट प्रशासनाने गाठले असून, आणखी एक महिना ही मोहीम राबविली जाणार आहे़
गोवर, रुबेला या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे़ या अंतर्गत परभणी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरणाला सुरुवात झाली़ जिल्हा प्रशासनातील जि़प़ आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या मोहिमेत सहभागी झाला असून, शाळा, महाविद्यालयांमधून ९ महिने ते १५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केले जात आहे़ लसीकरणाच्या या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे़ अकराच दिवसांमध्ये जिल्हा आरोग्य विभागाने ७५ टक्के उद्दिष्ट गाठले आहे़
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला १ लाख ४६ हजार १२२ बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट दिले असून, या विभागाने आतापर्यंत १ लाख १५ हजार १६२ बालकांना लसीकरण केले आहे़ जि़प़ आरोग्य विभागाने ७८़८१ टक्के उद्दिष्ट गाठले आहे़ तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत ३० हजार ८८९ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे़ ७ डिसेंबरपर्यंत ३० हजार ८८९ बालकांना लसीकरण करण्यात आले़ जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळून १ लाख ७७ हजार ११ बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १ लाख ३४ हजार ३६९ बालकांना लसीकरण करण्यात आले आहे़
जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात ५ लाख बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य विभागातील सर्व यंत्रणा लसीकरण मोहिमेमध्ये गुंतली आहे़ गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेला शाळा, महाविद्यालयांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे़ प्रत्येक शाळांमध्ये लसीकरणाचे शिबीर घेऊन सर्व शाळांना मोहिमेत सहभागी करून घेण्यात आले आहे़
जानेवारी महिन्यापर्यंत ही मोहीम चालविली जाणारी असून, लसीकरणाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता, त्या पूर्वीच उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली़