परभणीतील घटना; पत्नीस मारहाण करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 01:02 AM2018-06-30T01:02:40+5:302018-06-30T01:08:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पत्नीस लोखंडी रॉडने मारहाण करुन पतीने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शहरात घडली असून, दोघांवरही खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विद्यानगर भागात गुरुवारी रात्री ज्ञानेश्वर झरकर आणि पत्नी गीता झरकर यांच्यात वाद झाला. या वादातूनच मारहाणीचा हा प्रकार घडला. दरम्यान, सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दोघेही पती-पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे निदर्शनास आले. दोघांवरही परभणी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गीता झरकर यांचे भाऊ रवि माटरा यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. पती ज्ञानेश्वर झरकर याने गीता झरकर यांच्यावर लोखंडी रॉडने वार करुन स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन ज्ञानेश्वर झरकर यांच्याविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.