परभणीतील घटना: फरशीचे वार करून युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 01:13 AM2018-12-24T01:13:32+5:302018-12-24T01:13:54+5:30
शहरातील महावीर चित्र मंदिर परिसरात फरशीचे वार करुन एका युवकाचा खून केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन घटनेतील आरोपी निष्पन्न करीत अवघ्या सहा तासांत त्याला जेरबंद केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील महावीर चित्र मंदिर परिसरात फरशीचे वार करुन एका युवकाचा खून केल्याची घटना २३ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणात नानलपेठ पोलिसांनी तातडीने कारवाई करुन घटनेतील आरोपी निष्पन्न करीत अवघ्या सहा तासांत त्याला जेरबंद केले.
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात महावीर चित्र मंदिर जवळ एका युवकाच्या डोक्यात फरशीचे घाव घालून खून केल्याची घटना रविवारी सकाळी निदर्शनास आली. घटनेची माहिती नानलपेठ पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी हेही घटनास्थळी दाखल झाले. फरशीचे घाव घातल्याने मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव शेख मोबीन शेख अखिल (२२, रा.मदिना पाटी) असे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी अब्दुल रहीम यांच्या फिर्यादीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मयत शेख मोबीन शेख अखिल यास त्याच्या घरासमोर राहणाºया सय्यद फरहान सय्यद मुसा याने रविवारी सकाळीच बोलावून घेतले होते. तेव्हापासून सय्यद फरहान हा गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे पोलिसांनी सय्यद फरहान याचा शोध सुरु केला. पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे सय्यद उमर, नितीन कसबे यांनी बोरी शिवारात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. घटनेनंतर ६ तासांमध्येच मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पुंगळे हे करीत आहेत. दरम्यान, हा खून नेमक्या कोणत्या कारणाने झाला, याचा तपास पोलीस करीत आहेत.