परभणी : बोरीतील पक्षीस्थळावर वाढली पक्ष्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:35 AM2019-07-28T00:35:43+5:302019-07-28T00:36:36+5:30
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पक्षीस्थळावर गेल्या दोन महिन्यांपासून पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. बोरी येथील संजयनगरातील विठ्ठलराव अंभुरे या पक्षीप्रेमीकडून मागील १५ वर्षापासून या पक्षांना अन्न व पाणी पुरविण्याचे काम केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील पक्षीस्थळावर गेल्या दोन महिन्यांपासून पक्ष्यांची गर्दी वाढली आहे. बोरी येथील संजयनगरातील विठ्ठलराव अंभुरे या पक्षीप्रेमीकडून मागील १५ वर्षापासून या पक्षांना अन्न व पाणी पुरविण्याचे काम केले जात आहे.
बोरी येथे संजय नगरामधील विठ्ठलराव अंभुरे यांच्या घराच्या छतावर पक्ष्यांसाठी मागील १५ वर्षापासून पाण्याच्या कुंड्या, घरटे, तारे, झाडे लावून पाणी पिण्यासाठी हौद तयार केला. या ठिकाणी पक्षी येऊ लागले आहेत. तीव्र दुष्काळ निर्माण झाल्यामुळे जंगल व गायरानातील पाणीसाठे नष्ट झाले आहेत. त्यामुळे हे पक्षी पाण्याच्या व अन्नाच्या शोधात भटकंती करून मोठ्या प्रमाणावर पहाटे ६ वाजल्यापासून विठ्ठलराव अंंभुरे यांनी तयार केलेल्या पक्षीस्थळावर दाखल होत आहेत. त्यामुळे या नगरातील रहिवाशांनी पहाटे चिमणी, रान चिमणी, कावळे, पोपट, साळुंखी, पारव्या, डोंबकावळे, चिरक, पोनपोपट, कबुतरे, सुतारपक्षी, पावशा या पक्षांचा किलबिलाट ऐकावयास मिळत आहे. या पक्षांना दररोज १० किलो तांदूळ, ५ किलो बाजरी असे खाद्य अंभुरे कुटुंबियांकडून दिले जाते.
हे पक्षीस्थळ पाहण्यासाठी बोरी व परिसरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शालेय विद्यार्थी अनेक वेळा भेटी देऊन या उपक्रमाचे कौतुक करतात. सध्या दिवसेंदिवस विविध जातीचे पक्षी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत; परंतु, निसर्गरम्य वातावरण तयार करण्यासाठी पक्षी जीवंत असणे गरजेचे आहे. विठ्ठलराव अंभुरे यांनी पक्षीस्थळ उभारून संगोपन व संवर्धन करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे या उपक्रमाचे गाव परिसरात कौतुक होत आहे.
पक्ष्यांची सेवा सुरूच ठेवणार
बोरी येथील मी व माझ्या कुटुंंबियांनी पक्ष्यांची सेवा करण्याचे काम मागील पंधरा वर्षापासून सुरू केले आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबियांना पक्ष्यांच्या सेवेतून समाधान मिळते. हयात असेपर्यंत ही सेवा सुरूच ठेवणार आहे. इतरांनी सुद्धा या दुष्काळात पक्षी पाणी व अन्ना वाचून मृत्यूमुखी पडू नयेत, यासाठी पक्षीसेवा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पक्षीप्रेमी विठ्ठलराव अंभुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केले.