परभणी : वाढत्या उन्हाने रस्ते निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 01:26 AM2019-04-30T01:26:15+5:302019-04-30T01:26:28+5:30
उष्णतेच्या झळांनी सध्या तालुका होरपळून निघत आहे. २९ एप्रिल रोजी शहारात ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. या उन्हाचा परिणाम सोमवारी आठवडे बाजारावर देखील झाल्याचे दिसून आले. नेहमी गर्दीने भरुन असलेल्या आठवडे बाजारात दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान शुकशुकाट दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : उष्णतेच्या झळांनी सध्या तालुका होरपळून निघत आहे. २९ एप्रिल रोजी शहारात ४५ अंशाच्यावर तापमानाची नोंद झाली. या उन्हाचा परिणाम सोमवारी आठवडे बाजारावर देखील झाल्याचे दिसून आले. नेहमी गर्दीने भरुन असलेल्या आठवडे बाजारात दुपारी १२ ते ४ वाजेच्या दरम्यान शुकशुकाट दिसून आला.
मागील चार दिवसांपासून उन्हाचा पारा वाढतच चालला असून नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील रस्ते निर्मनुष्य होत असून याचा परिणाम व्यावसायावर होत आहे. लहान बालके, वयोवृद्धांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.
महत्त्वाचे काम असल्यावरच नागरिक दुपारी घराबाहेर पडत असल्याचे चित्र सद्यस्थितीत शहरासह तालुक्यात दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे शेतकऱ्यांनी शेतातील मशागतीचे कामे पुढे ढकल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांकडून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत शेतातील कामे आटोपण्यावर भर दिला जात आहे. उन्हापासून बचावासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी टोपी, रुमालाचा वापर वाढला आहे. घशाला कोरड पडल्यावर थंड पेयाचा आधार घेतला जात आहे. संपूर्ण मानवत तालुक्यात उष्णतेची लाट असून दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत शहरातील रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे. प्रत्येकजण सावलीचा आधार घेत असल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर झालेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे रस्त्यालगत थांबण्यासाठीही झाडाची सावली शिल्लक राहिली नाही. त्यामुळे होणारा त्रास टाळण्यासाठी नागरिक गारवा असलेल्या ठिकाणी थांबणे पसंत करीत आहेत. गेल्या आठ दिवसापासून तापमान वाढतच चालल्याने बाजारपेठेवर देखील याचा परिणाम दिसून येत आहे. बाजारपेठेतील उलाढाल ठप्प झाली आहे.
सायंकाळी ६ वाजेनंंतर बाजारपेठेत गर्दी
४उन्हाच्या या लाटेमुळे नेहमी गजबजुन राहत असलेली शहरातील भाजी मार्केट, कापड मार्केट, जिल्हा बँक परिसर, बसस्थानक या प्रमुख ठिकाणांसह तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, पोलीस ठाणे परिसर, मोंढा इत्यादी भागांत दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे.
४संध्याकाळी ६ वाजल्यानंतर लिंबू सरबत, उसाचा रस पिण्यासाठी दुकानांवर गर्दी करीत आहेत. त्याचबरोबर फळे खरेदी करण्यासाठीही नागरिक गर्दी करीत आहेत.
मुलांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, पांढºया कपड्याचा वापर करावा. डोकेदुखी किंवा चक्कर आल्यास डॉक्टरांना भेटावे.
-डॉ योगेश तोडकरी
बालरोग तज्ञ