परभणी : शस्त्र परवान्यांची चौकशी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 12:23 AM2018-09-19T00:23:49+5:302018-09-19T00:27:07+5:30
जिल्ह्यातील नागरिकांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चौकशीच्या कामात शिथीलता आल्याने तब्बल दोन वर्षांपासून १०० शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील नागरिकांना दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चौकशीच्या कामात शिथीलता आल्याने तब्बल दोन वर्षांपासून १०० शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे़
खाजगी व्यक्तींना त्यांच्या संरक्षणासाठी शस्त्र वापरावयाचे असल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत रितसर शस्त्र परवाना घेणे बंधनकारक आहे़ हा परवाना ठराविक मुदतीसाठी दिला जातो़ प्रत्येक वेळी मुदत संपल्यानंतर परवान्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयातून शस्त्र परवाना दिला जात असला तरी पोलीस प्रशासन संबंधित व्यक्तीची चौकशी करते़ त्यानंतर पोलीस प्रशासनाने पाठविलेल्या अहवालावरून शस्त्र पवान्यांचे नूतनीकरण केले जाते़ परभणी जिल्ह्यामध्ये ८४३ नागरिकांना शस्त्र परवाने दिले असून, त्यापैकी १०० शस्त्र परवान्यांची मुदत संपली आहे़ त्यात २०१६ मध्ये ५० आणि २०१७ मध्ये ५० परवान्यांची मुदत संपली आहे़
मुदत संपलेल्या शस्त्र परवान्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलीस अधीक्षकांना वारंवार पत्र व्यवहारही झाला आहे़ पोलीस प्रशासनातील पोलीस उपनिरीक्षकांमार्फत या शस्त्र परवान्यांची चौकशी केली जाते़ त्यानंतर गृह विभाग चौकशी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केल्यानंतरच या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येते़ मात्र पोलीस प्रशासनाकडून वेळेत चौकशी होत नसल्याने चौकशी अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झालेला नाही़
परिणामी १०० शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे़ आगामी काळामध्ये निवडणुका होवू घातल्या आहेत़ त्यापूर्वी सण, उत्सवांचे दिवस आहेत़ अशा परिस्थितीमध्ये मुदत संपलेल्या परवान्यांचे वेळेत नूतनीकरण होणे आवश्यक आहे़ संबंधित परवानाधारकाकडून शस्त्राचा दुरुपयोगही होवू शकतो़
पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष घालून मुदत संपलेल्या शस्त्र परवान्यांची वेळेत चौकशी करून अहवाल सादर करण्यासंदर्भात संबंधितांना आदेशित करावे, अशी मागणी होत आहे़
चार महिन्यांपूर्वीच पाठविले स्मरणपत्र
२०१६-१७ मधील १०० शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण रखडले आहे़ तर येत्या काळामध्ये ३१ डिसेंबर २०१८ रोजी १४० परवान्यांची मुदत संपणार आहे़ या १४० परवान्यांचीही वेळेत चौकशी व्हावी़ यासाठी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले असून, या पत्रासोबत मुदत संपणाºया शस्त्र परवानाधारकांची यादी जोडली आहे़
३१ डिसेंबरपूर्वी या सर्व शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करण्यासंदर्भात अहवाल पाठवावा़ हा अहवाल वेळेत प्राप्त न झाल्यास परवानाधारकांच्या नूतनीकरणास आपली संमती आहे, असे गृहित धरून नूतनीकरणाची कारवाई केली जाईल, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे़
त्यामुळे पोलीस प्रशासनाला आता किमान ३१ डिसेंबरपूर्वी मुदत संपलेल्या शस्त्र परवानाधारकांची चौकशी करणे गरजेचे झाले आहे़
३० दिवसांत चौकशीचे बंधन
जिल्हा दंडाधिकाºयांनी शस्त्र परवान्या संदर्भात चौकशी करण्याचे सूचित केल्यानंतर पोलीस प्रशासनाने संबंधित परवानाधारकाची चौकशी करून त्याचा अहवाल ३० दिवसांमध्ये जिल्हा दंडाधिकाºयांकडे पाठविणे बंधनकारक आहे़ शस्त्र कायद्याच्या सुधारित नियम २०१० अन्वये हे बंधन घालण्यात आले आहे़ त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून या १४० शस्त्र परवाना धारकांसंदर्भात वेळेत अहवाल सादर होतो की नाही? याकडे लक्ष लागले आहे़