परभणी : तापमानाने वाढली दुष्काळाची तीव्रता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:25 AM2019-03-27T00:25:01+5:302019-03-27T00:25:37+5:30
जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. पाणीटंचाई बरोबरच उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर सुरु झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून ग्रामीण भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत आहेत. पाणीटंचाई बरोबरच उन्हामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या साधनांचा वापर सुरु झाला आहे.
यावर्षी फेब्रुवारी महिन्यापर्यंत वातावरणात थंडी निर्माण झाली होती; परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तापमान वाढू लागले. सोमवारी जिल्ह्यात ४० अंश तापमानाची नोंद झाली होती. मंगळवारीही पारा वाढत जावून ४०.५ अंशावर स्थिरावला. तापमानाने ४० गाठल्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा नागरिकांना सहन कराव्या लागल्या. मंगळवारी सकाळी १० वाजेपासूनच ऊन तापले होते. कडक उन्हामुळे दिवसभर उकाडाही निर्माण झाला होता.
दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्र विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यापुढील चार दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २७ मार्च रोजी ४१, २८ मार्च रोजी ४०, २९ मार्च रोजी ४१ आणि ३० मार्च रोजी परभणीचा पारा ४२ अंशावर पोहचण्याचा अंदाज वर्तविला आहे.
कमाल तापमानाबरोबरच किमान तापमानातही वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे. कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसमी सेवा या विभागाने दिलेल्या माहितीनुसार किमान तापमानामध्ये ३० मार्चपर्यंत २४ अंशापर्यंतची वाढ वर्तविली आहे. सध्या हे तापमान २१ अंशापर्यंत आहे. किमान तापमानात वाढ झाल्यानंतर रात्रीच्या वेळी देखील वातावरणातील उकाडा वाढणार आहे.
कमाल आणि किमान तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना दिवसा तीव्र उन्हाचे चटके तर रात्रीच्या वेळी अस्वस्थ करणाऱ्या उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. सध्या हा त्रास सुरु झाला असल्याने नागरिकांनी आतापासूनच काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठेमध्ये पांढरे रुमाल आणि टोप्या, गॉगल्सची विक्री वाढली आहे. तसेच कूलर, फॅन या इलेक्ट्रॉनिक वस्तूंनाही मागणी वाढली आहे.
टंचाईत पडली भर
४यावर्षी परभणी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ऊन वाढत चालल्याने भूजल पातळीही मोठ्या प्रमाणात खोल जात आहे. परिणामी पाण्यासाठी भटकंती होत आहे.