परभणी : राकाँकडून दुसऱ्यांदा इच्छुकांच्या मुलाखती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:08 AM2019-07-23T00:08:02+5:302019-07-23T00:08:15+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सोमवारी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली़ विशेष म्हणजे, यापूर्वी मुंबईतच मुलाखतीची प्रक्रिया संपन्न झाली होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया सोमवारी शहरातील राष्ट्रवादी भवन येथे पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत पार पडली़ विशेष म्हणजे, यापूर्वी मुंबईतच मुलाखतीची प्रक्रिया संपन्न झाली होती़
विधानसभा निवडणुकीची तयारी विविध राजकीय पक्षांकडून सुरू झाली आहे़ या अनुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची प्रक्रिया प्रत्येक पक्षांकडून पार पाडली जात आहे़ या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंबई येथे चालू महिन्यातच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली होती़ त्यावेळी आ़डॉ़ मधुसूदन केंद्रे व माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर यांच्या समर्थकांमध्ये जोरदार वादावादी झाली होती़ त्यामुळे या संदर्भातील बैठक राज्यभर गाजली होती़ त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने २२ जुलै रोजी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली होती़
यासाठी पक्ष निरीक्षक आ़ रामराव वडकुते, आ़ उषाताई दराडे यांची उपस्थिती होती़ यावेळी पक्ष निरीक्षकांनी परभणी, गंगाखेड, पाथरी विधानसभा मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या़ गंगाखेडचे आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे व जिंतूरचे आ़ विजय भांबळे हे पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत़ तशी त्यांनी पक्षाला कल्पना दिली होती़
इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर या संदर्भातील अहवाल पक्ष निरीक्षक वरिष्ठांकडे सादर करणार आहेत़ त्यानंतर उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे़
१६ इच्छुकांनी केले होते अर्ज
४जिंतूर विधानसभा मतदार संघातून आ़ विजय भांबळे तर पाथरी विधानसभा मतदार संघातून विठ्ठल सूर्यवंशी, लक्ष्मीकांत देशमुख यांनी आणि गंगाखेड विधानसभा मतदार संघातून आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे, माजी आ़ सिताराम घनदाट, प्रल्हाद मुरकुटे, संजय कदम, शिवाजी दळणर यांनी अर्ज केले होते़
४तसेच परभणी विधानसभा मतदारसंघातून शहराध्यक्ष स्वराजसिंह परिहार, किरण सोनटक्के, सोनाली देशमुख, माजी महापौर प्रताप देशमुख, जाकेर अहमद खान, अली खान मोईन खान, गंगाधर जवंजाळ यांनी अर्ज केले होते़ त्यानुसार मुलाखतीची प्रक्रिया पार पडली़
घोषणांनी परिसर दणाणला
४मुलाखतीच्या प्रारंभी पक्षाच्या नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ त्यानंतर मुलाखतीची प्रक्रिया सुरू झाली़ यावेळी मुलाखतीसाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले़ मुलाखतीला येताना इच्छुकांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी भवनमध्ये आणले होते़
४मुलाखत प्रक्रिया सुरू असताना समर्थक त्यांच्या नेत्यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करताना दिसून आले़ यामध्येच इच्छुकांची मुलाखत प्रक्रिया पार पडली़ त्यानंतर जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या कक्षात नगरसेवकांशी संवाद साधण्यात आला़
दिग्गजांची गैरहजेरी
४राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित मुलाखत प्रक्रियेस जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी, जिंतूरचे आ़ विजय भांबळे, गंगाखेडचे आ़ मधुसूदन केंद्रे हे गैरहजर होते़ पूर्व नियोजित कार्यक्रमांमुळे हे दिग्गज नेते गैरहजर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली़
वंचित बहुजन आघाडीच्या शुक्रवारी मुलाखती
४वंचित बहुजन आघाडीच्या वतीने इच्छुक उमेदवारांकडून १५ ते २३ जुलै या कालावधीत चारही विधानसभा मतदारसंघातून अर्ज मागविण्यात आले आहेत़ आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी वंचितकडे उमेदवारी मागितली आहे़ त्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपातील काही नेत्यांचा समावेश आहे़ मंगळवार हा वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे़ त्यानंतर २६ जुलै रोजी इच्छुक उमेदवारांच्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाच्या सदस्यांकडून मुलाखती घेतल्या जाणार आहेत़ त्यानंतर वंचितचे उमेदवार निश्चित होणार आहेत़ मुलाखतीच्या वेळी वंचितचे राज्यस्तरीय नेते परभणीत उपस्थित राहणार आहेत़