परभणी : अमरदीप रोडे खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:14 PM2019-04-22T23:14:47+5:302019-04-22T23:14:53+5:30
येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
नगरसेवक अमरदीप रोडे यांच्या खून प्रकरणात सुरु असलेल्या तपासाविषयी शंका व्यक्त करीत २२ एप्रिल रोजी परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलना दरम्यान अनेकांनी आपल्या मार्गदर्शनातून या खून प्रकरणात होत असलेली दिरंगाई उपस्थितांसमोर मांडली. आरोपींची माहिती दिल्यानंतरही त्यांना अटक करण्यास जाणीवपूर्वक विलंब लावला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
या प्रसंगी रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे म्हणाले, रोडे यांच्या हत्येमागे कोणाचे षडयंत्र आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलीस प्रशासन संथ गतीने तपास करीत आहे. तेव्हा या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला अटक करावी, गुन्ह्यातील तलवार आरोपींकडून जप्त करण्यात आलेली नाही. ती जप्त करावी, आरोपींबाबत वारंवार माहिती दिल्यानंतरही आरोपींना अटक करण्यास जाणीवपूर्वक विलंब करण्यात येत आहे. फिंगरप्रिंट व डॉग युनिटची मदत न घेता तपास केला जात आहे इ. आरोप करीत आरोपीस सहाय्य करणाºया तपासी अंमलदारास निलंबित करावे, हा खटला अंडर ट्रायल चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, साक्षीदारांना संरक्षण देऊन उर्वरित आरोपींना अटक करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात सुधीर साळवे, पवनकुमार शिंदे, नगरसेवक सुशील कांबळे, किरण घोंगडे, आकाश लहाने, प्रदीप वाहुळे, अमोल गायकवाड, उमेश लहाने, सुधीर कांबळे, सुभाष जोंधळे, सिद्धार्थ कसारे, राहुल कनकुटे, रवि खंदारे, विनायक साळवे, संदीप खाडे, नागसेन घागरमाळे, सुमेध डोळसे, कपिल पैठणे, सचिन खरात, तुषार कांबळे, आनंद ढाले, नीलेश डुमणे, गौतम निवडुंगे, बंटी पगारे, धम्मदीप रोडे, आर.आर. रोडे, विजय झोडपे, आशाताई मालसमिंदर, द्वारकाबाई गंडले, लक्ष्मीबाई बनसोडे, राणूबाई वायवळ, पार्वतीबाई कांबळे, कालिंदा घागरमाळे, रेखा आवटे, नंदा गायकवाड, मथुराबाई भद्रे आदींसह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते.