परभणी : भांबळेंच्या चॅलेंजनंतर जाधव यांच्या क्लिप झाल्या व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:10 AM2019-01-25T00:10:15+5:302019-01-25T00:10:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क परभणी : जिंतूर येथील जाहीर सभेत आ़ विजय भांबळे यांनी शिवसेनेचे खा़ बंडू जाधव यांच्यावर टीका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर येथील जाहीर सभेत आ़ विजय भांबळे यांनी शिवसेनेचे खा़ बंडू जाधव यांच्यावर टीका करताना ते सभागृहात कधीच बोलत नाहीत़ त्यांची सभागृहातील भाषणाची क्लिप दाखवा, ५ लाखांचे बक्षीस देतो, अशी घोषणा केल्यानंतर खा़ जाधव यांच्या सभागृहातील भाषणाच्या क्लिप बुधवारी शिवसैनिकांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केल्या़ या प्रकाराचीच दिवसभर जिल्ह्यात चर्चा होती़
जिंतूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस निर्धार परिवर्तन यात्रे अंतर्गत आयोजित जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादीचे आ़ विजय भांबळे यांनी, खा़ बंडू जाधव हे लोकसभेमध्ये कधीच बोलले नाहीत़ ते नेहमी परभणीतच असतात़ त्यांची सभागृहातील भाषणाची एक तरी व्हिडीओ क्लिप दाखवा, ५ लाख रुपयांचे बक्षीस देतो, असे जाहीर केले होते़ त्यानंतर गुरुवारी दिवसभर खा़ बंडू जाधव यांच्या भाषणाच्या दोन क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्या़
एका क्लिपमध्ये खा़ जाधव हे राज्यातील दुष्काळाचा प्रश्न मांडत असल्याचे दिसून येत आहे़ तर दुसऱ्या क्लिपमध्ये नांदेड विभागातील रेल्वे प्रश्न सभागृहात मांडत असल्याचे दिसून येत आहे़ दोन्ही क्लिप गतवर्षीच्या आहेत़ शिवसैनिकांनी या क्लिप व्हायरल करीत आ़ भांबळे यांना ५ लाखांचे बक्षीस देण्याचे आव्हान केले आहे़
काही शिवसैनिकांनी सवंग लोकप्रियतेसाठी धादांत खोटे आरोप जनता सहन कशी करील, अशा कॉमेंट केल्या आहेत़ राजकारणात टिकाटिप्पणी होत असते; परंतु, ती वैयक्तीक नसावी, असा संकेत आहे़ परंतु, आ़ भांबळे यांनी सभ्यतेचे हे संकेत ओलांडले आहेत, अशीही टीका फेसबुकद्वारे शिवसैनिकांनी केली आहे़ दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही या टिकेला उत्तर दिले असून, २०१४ मध्ये १५ लाख देतो म्हणून सत्तेत आलेले कालपासून ५ लाख रुपये मागत आहेत, अशी उपरोधात्मक खोपरखळी हाणली आहे़ काहींनी खा. जाधव यांच्या कार्यपद्धतीवर टिका केली आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे़ त्यामुळे खा़ जाधव यांच्या संसदेतील भाषणाच्या क्लिपनंतर आ़ भांबळे काय उत्तर देतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़
संसदेत ९ आॅक्टोबर २०१५ रोजी खा़ बंडू जाधव यांनी महाराष्ट्रातील दुष्काळाच्या प्रश्नावर मराठीमध्ये भाषण केले होते़ या भाषणाची ही क्लिप गुरुवारी दिवसभर फेसबुक, व्हॉटस्अॅप, टिष्ट्वटर आदी समाजमाध्यमांवर व्हायरल झाली होती़ फेसबुकवर याबाबत शिवसेना-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले़
राष्ट्रवादीचा लोकसभेचा उमेदवार ठरेना
परभणी- परभणी लोकसभा मतदार संघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार रात्री सर्व जण एकत्र बसून निश्चित करू, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारच्या जाहीर सभेमधून घोषित केले असले तरी प्रत्यक्षात मात्र उमेदवाराचे नाव निश्चित झाले नसल्याचेच गुरुवारी स्पष्ट झाले आहे़
४राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन यात्रा परभणी लोकसभा मतदार संघातील घनसावंगी, जिंतूर व गंगाखेड शहरात बुधवारी दाखल झाली होती़ या अंतर्गत घनसावंगी येथे बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ़ जयंत पाटील यांनी परभणी लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस तरुण चेहºयाला संधी देण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते. तसेच पक्षाचा उमेदवार रात्री बसून चर्चा करून आम्ही निश्चित करू, असेही ते म्हणाले होते़
४त्यामुळे बुधवारी रात्री परभणी लोकसभेचा राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित होवून गुरुवारी तशी घोषणा होईल, असे अपेक्षित होते़ परंतु, गुरुवारी दिवसभर तशी कुठलीही घडामोड घडली नाही़ उलट बुधवारी गंगाखेडची सभा रात्री १०़१५ वाजता संपली़ सभेला उशीर झाल्याने हे नेते परळीला गेले़ त्यामुळे परभणीच्या उमेदवार निश्चितीवर चर्चा झाली नसल्याचे समजते़
४दुसरीकडे परभणी लोकसभेसाठी पक्ष आ़ विजय भांबळे यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे़ परंतु, आ़ भांबळे यांची निवडणूक लढविण्याची इच्छा नाही़ तसे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे़ माजी जि़प़ अध्यक्ष राजेश विटेकर, बाळासाहेब जामकर, माजी खा़ सुरेश जाधव या तिन्ही नेत्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे़ त्या दृष्टीकोणातून हे तिन्ही नेते कामाला लागले आहेत़ कार्यकर्त्यांना मात्र उमेदवाराच्या घोषणेची लागलेली उत्सुकता कायम आहे़