परभणी-जिंतूर रस्ता: राष्टÑीय महामार्गाच्या कामाला मिळेना गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 12:57 AM2018-11-05T00:57:14+5:302018-11-05T00:57:18+5:30
परभणी ते जिंतूर दरम्यान राष्टÑीय महामार्गाचे काम सुरू असून मागील एक वर्षापासून हे काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): परभणी ते जिंतूर दरम्यान राष्टÑीय महामार्गाचे काम सुरू असून मागील एक वर्षापासून हे काम पूर्ण होत नसल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
परभणी ते जिंतूर दरम्यान राष्टÑीय महामार्ग निर्मितीचे काम सुरू झाले आहे. वर्षभरापूर्वी या कामाला सुरूवात झाली. या अंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार असल्याने परभणी-जिंतूर हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवला आहे. काही भागात भरावही टाकण्यात आला आहे. मात्र काम संथ गतीने सुरू असल्याने प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
मागील वर्षभरापासून रस्त्याच्या निर्मितीचे काम सुरू असून ते अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. जागोजागी खड्डे पडले असून वाहनधारकांना अडखळत वाहने चालवावी लागत आहेत. सध्या मुरूम टाकून रस्ता मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक भागात मुरूम टाकण्यात आला आहे. परंतु, या मुरूमावर पाणी टाकले जात नाही. त्यामुळे हा संपूर्ण रस्ता धुळीचा झाला आहे. वाहनधारकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे कामही संथ गतीने होत असून या कामामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे लक्ष देऊन कामाला गती द्यावी. तसेच हे काम दर्जेदार करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून केली जात आहे. सध्या तरी प्रवाशांना परभणी ते जिंतूर रस्त्या दरम्यान प्रवास करताना यातना सहन कराव्या लागत आहेत.
धुळीमुळे पिकांचे नुकसान
४परभणी ते जिंंतूर या रस्त्याच्या निर्मितीचे काम केले जात आहे. कंत्राटदाराने रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी जागोजागी मुरूम टाकला आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ झाली आहे. परभणी ते जिंतूर हा मार्ग वर्दळीचा आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून धावतात. त्यामुळे रस्त्यावरील उडालेली धूळ शेजारी असलेल्या शेत शिवारात पसरत आहे. परिणामी पिकांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर जगविलेली पिके धुळीमुळे धोक्यात येत आहेत. तेव्हा संबंधित कंत्राटदाराला मुरूमावर पाणी टाकण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे .