परभणी :जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष निवडीला लागेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:07 AM2018-06-17T00:07:11+5:302018-06-17T00:07:11+5:30
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांची निवड होवून महिनाभराची कालावधी लोटला तरी उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली होत नसल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षांची निवड होवून महिनाभराची कालावधी लोटला तरी उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली होत नसल्याने संचालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे़
परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १५ मे रोजी पंडितराव चोखट यांची निवड झाली होती़ माजी आ़ रामप्रसाद बोर्डीकर यांच्या ताब्यातून माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी हे पद आपल्या गटाकडे घेतले़ जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी स्वत: वरपूडकर उत्सुक होते़ त्या दृष्टीकोणातून त्यांनी तयारीही केली होती; परंतु, वरपूडकर हे प्रक्रिया मतदार संघातून निवडून आल्याने त्यांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष होता येत नाही, असा आक्षेप हिंगोलीचे भाजपाचे आ़ तान्हाजी मुटकुळे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविला होता़ हा आक्षेप मान्य करीत निवडणूक निर्णय अधिकाºयांनी वरपूडकर यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविला होता़ त्या नंतर ऐनवेळी पंडितराव चोखट यांची अध्यक्षपदासाठी निवड झाली़ या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकत्र आल्याचे दिसून आले़ अध्यक्षपदी चोखट यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याकडील उपाध्यक्षपदाची लवकरच निवड होईल, अशी चर्चा होती; परंतु, अध्यक्षांची निवड होवून एक महिन्याचा कालावधी लोटला तरी उपाध्यक्ष निवडीच्या हालचाली होताना दिसून येत नाहीत़
त्यामुळे काही संचालक अस्वस्थ झाले आहेत़ प्रशासकीय पातळीवरूनही उपाध्यक्ष पदाची निवड करण्यासंदर्भात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही़
उपाध्यक्षपद हिंगोलीला जाण्याची चर्चा
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी हिंगोली जिल्ह्यातील ३ संचालकांनी वरपूडकर यांना पाठींबा दिला होता़ यामध्ये खा़ राजीव सातव व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी स्पष्ट भूमिका घेतली होती़ त्यामुळेच बोर्डीकर यांच्या गटाला अध्यक्षपदापासून रोखता आले़ याची उतराई म्हणून जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद हिंगोलीला देण्याची चर्चा होवू लागली आहे़ ही चर्चा प्रत्यक्षात उतरते की परभणी जिल्ह्याकडेच उपाध्यक्षपद कायम राहते, याकडे दोन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे़