परभणी : ई-आॅफीस अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 11:42 PM2018-12-26T23:42:09+5:302018-12-26T23:43:15+5:30
जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी जिल्हा प्रशासन ई-आॅफीस ही संकल्पना राबवित आहे़ या अंतर्गत ७० टक्के कामे पूर्ण झाले असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात प्रत्यक्ष ई-आॅफीसच्या सहाय्याने कामकाज सुरू केले जाणार आहे़
जिल्हा प्रशासनामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयांमधून सर्वाधिक कामे केली जातात़ जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने या सर्व कार्यालयांमध्ये दररोज महत्त्वपूर्ण निर्णय होतात़ सद्यस्थितीला जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर कार्यालयांमधून होणारे कामकाज हे आॅफलाईन आहे़ निर्णयांचे आदेश काढणे, दाखल झालेल्या तक्रारी किंवा फाईलींवर मॅन्युअली कामकाज केले जाते़ या कामकाजात सुधारणा आणि गतिमानता आणण्यासाठी सर्व कामकाज पेपरलेस करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर यांनी घेतला आहे़
या निर्णयानुसार ई-आॅफीस ही संकल्पना अंमलात आणली जाणार आहे़ या प्रक्रियेत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झालेला कोणताही कागद पहिल्याच टप्प्याला स्कॅन करून तो आॅनलाईन केला जाणार आहे़ दाखल झालेल्या तक्रारी, विविध योजनांच्या फाईली पेपरलेस केल्या जाणार असून, संगणकावरच या फाईलींवर निर्णय घेणे, शेरा देणे तसेच पुढील अधिकाºयांकडे ही फाईल पाठविणे आणि अंतिमत: निर्णय घेऊन संगणकामार्फतच तो संबंधिताला कळविण्याची सुविधा निर्माण केली आहे़ या प्रक्रियेमुळे प्रत्येक विषयावर बारकाईने लक्ष ठेवणे सोयीचे होणार आहे़ त्याचप्रमाणे एखादे काम अडले असले तर ते नेमके कुठे अडले आहे? कामात दिरंगाई का होत आहे? या सर्व बाबी स्पष्ट होणार असून, त्यातून प्रशासकीय कामकाजाला गती मिळणार आहे़ मागील सहा महिन्यांपासून या संदर्भात प्रक्रिया सुरू आहे़ या अंतर्गत सर्व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे़ तसेच आवश्यक त्या बाबीही पूर्ण करण्यात आल्या असून, सद्यस्थितीला ७० टक्के कामे पूर्ण झाली आहेत़
एनआयसी अंतर्गत ई आॅफीसची अंमलबजावणी केली जात असून, मुंबई येथील एनआयसीचे अधिकारी यावर नियंत्रण ठेवून आहेत़ जिल्ह्यात सध्या ई आॅफीसची डेमो साईट सुरू आहे़ अधिकारी आणि कर्मचाºयांचा त्यावर सरावही होत आहे़ ५ मास्टर ट्रेनर्सच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचाºयांना प्रशिक्षण दिले जात आहे़ सध्या अधिकारी, कर्मचाºयांच्या शंकांचे निरसन या माध्यमातून केले जात असून, एनआयसीकडून हे सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाकाजाला सुरुवात होणार आहे़
ई आॅफीसची ही सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर हे दररोज या प्रक्रियेचा आढावा घेत आहेत़ या प्रक्रियेवर सध्या सुरू असलेले कामकाज लक्षात घेता जानेवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसºया आठवड्यात प्रत्यक्ष ई आॅफीसच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली़ दरम्यान, या प्रक्रियेमुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेत होऊन सुविधा मिळणार आहेत़
शासकीय संकेतस्थळावर ई-मेल
ई आॅफीसमध्ये कामकाज करीत असताना सर्व अधिकारी, कर्मचाºयांचे ई-मेल आयडी शासकीय संकेतस्थळावर असणे आवश्यक आहे़ मागील काही महिन्यांपासून ईमेल आयडी तयार करण्याचे काम सुरू आहे़ ९५ टक्के अधिकारी आणि कर्मचाºयांचे ईमेल आयडीही तयार झाले आहेत़ त्याच प्रमाणे सर्व कामे आॅनलाईन होणार असल्याने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाºयांची डिजिटल स्वाक्षरी या प्रणालीमध्ये आवश्यक आहे़ जिल्ह्यातील ७० टक्के अधिकारी, कर्मचाºयांच्या डिजीटल स्वाक्षरीचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यामुळे या दोन महत्त्वाच्या बाबी अंतिम टप्प्यात असल्याने प्रत्यक्ष कामकाजही लवकरच सुरू होईल, अशी अपेक्षा आहे़ जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबरच तहसील आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातही ही प्रणाली लागू होणार असल्याने या कार्यालयातील संगणक लॅन करणे, इंटरनेट सुविधा देण्याचे काम पूर्ण झाले आहे़