परभणी : पाणीपुरवठा योजनाचाचणी अंतिम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 12:35 AM2019-02-07T00:35:30+5:302019-02-07T00:36:07+5:30
येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येलदरी येथून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, आठवडाभरापासून येलदरी ते धर्मापुरी या अंतरात पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ दोन दिवसांमध्ये चाचणीचे कामही पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे़
परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत येलदरी प्रकल्पावरून परभणी शहरासाठी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती़ दहा वर्षापासून ही योजना रखडली असून, सध्या अमृत योजनेतून याच योजनेतील उर्वरित कामे केली जात आहेत़ या अंतर्गत शहरापासून साधारणत: ८ किमी अंतरावर असलेल्या धर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारणीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे़ तसेच येलदरी येथे उद्भव विहीर, येलदरी ते बीपीटी पर्यंतचे कामही पूर्ण झाले असून, येलदरीपासून परभणीपर्यंत जलवाहिनीही टाकण्यात आली आहे़ येलदरी जलाशयातून धर्मापुरी परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी घेण्याची चाचणी केली जात आहे़ धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पाणी पोहचल्यानंतर या योजनेचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार असल्याने या चाचणीला महत्त्व आले आहे़
सध्या ही चाचणी घेण्याचे काम सुरू आहे़ येलदरी जलाशयापासून ७ किमी अंतरावर असलेल्या जिंतूर परिसरात ब्रेक पॉर्इंट टर्मिनन बसविण्यात आले आहे़ १ कोटी २५ लाख लिटर क्षमता असलेल्या या बीपीटीपर्यंतची चाचणी पूर्ण झाली असून, पम्पींगच्या सहाय्याने येलदरीतील पाणी बीपीटीपर्यंत पोहचले आहे़ बीपीटीपासून ते धर्मापुरीपर्यंत पाणी घेण्याची चाचणी सध्या सुरू आहे़ मात्र या अंतरात टाकलेली जलवाहिनी अनेक ठिकाणी मातीने बंद पडली आहे़ त्यामुळे या जलवाहिनीतील ब्लॉकेज काढण्याचे काम मनपाच्या वतीने केले जात आहे़ जिंतूर शहर, बोरी, झरीमार्गे धर्मापुरीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे़ ५ ते ६ महिन्यांपूर्वी जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून, प्रत्यक्ष चाचणी घेताना या जलवाहिनीत अनेक ठिकाणी माती अडकून पडल्याचे समोर आले़ त्यामुळे चाचणी घेण्यापूर्वी जलवाहिनीतील ब्लॉकेज मोकळे करावे लागणार असून, हे काम सध्या सुरू आहे़ विशेष म्हणजे बीपीटीपासून ते धर्मापुरी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत केवळ गुरुत्वार्षणाच्या तत्त्वावरच पाणी येणार आहे़ यासाठी १०० मीटर ग्रॅगीएंट ठेवण्यात आला आहे़ ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कामाला सुरूवात होईल़ येत्या एक-दोन दिवसांत प्रत्यक्ष धर्मापुरी जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेऊन चाचणी केली जाणार आहे़ ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर येलदरीचे पाणी जलवाहिनीच्या सहाय्याने परभणीपर्यंत पोहोचविण्याचा टप्पाही पूर्ण होईल़ त्यामुळे या चाचणीला महत्त्व आले असून, येत्या एक-दोन दिवसांत चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेने दिली़
मीटर रुमच्या कामाला सुरुवात
येलदरी येथे उद्भव विहीर बांधण्यात आली असून, धरणातील पाणी उपसा करण्यासाठी स्वतंत्र मीटर रुमही अमृत योजनेंतर्गत तयार केली जात आहे़ मीटर रुम उभारणीसाठी कंत्राटदारास मार्कआऊट टाकून देण्यात आले आहेत़ यामुळे मीटर रुम उभारणीच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे़ मीटर रुम उभारणीनंतर पम्पींगच्या सहाय्याने पाणी उपसा करणे शक्य होणार आहे़ हे कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली़
जलशुद्धीकरणाचे ८० टक्के काम
धर्मापुरी परिसरात जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे़ या ठिकाणी एरीयशन काम पूर्ण झाले असून, या एरीयशनमध्ये गढूळ पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया होणार आहे़ तसेच दोन मोठे टँक उभारण्यात आले असून, या टँकमधून शुद्धीकरणाचे काम होणार आहे़ धर्मापुरीपासून ते परभणी शहरापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे कामही पूर्ण झाले आहे़ त्यामुळे येलदरी धरणातील पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत पोहोचल्यानंतर परभणीकरांना पिण्यासाठी मिळण्याची प्रतीक्षाही संपणार आहे़