परभणी : पक्ष मान्यतेच्या शिलेदारास मंत्रीपदाची लागली आस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:05 AM2019-05-26T00:05:50+5:302019-05-26T00:05:59+5:30
शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देणाऱ्या परभणी जिल्ह्याने पक्षाला गेल्या ३० वर्षात भरभरुन दिले. आता पक्षाने परतफेडीच्या माध्यमातून परभणीला देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राखणाºया ‘परभणी’ या शिलेदारास केंद्रात मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा परभणीवासियांकडून व्यक्त केली जात आहे.
अभिमन्यू कांबळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळवून देणाऱ्या परभणी जिल्ह्याने पक्षाला गेल्या ३० वर्षात भरभरुन दिले. आता पक्षाने परतफेडीच्या माध्यमातून परभणीला देण्याची वेळ आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला अबाधित राखणाºया ‘परभणी’ या शिलेदारास केंद्रात मंत्रीपद मिळावे, अशी अपेक्षा परभणीवासियांकडून व्यक्त केली जात आहे.
१९७० च्या दशकापासून निवडणूक लढविणाºया शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता परभणी लोकसभा मतदारसंघाने मिळवून दिली. १९८९ मध्ये या पक्षातर्फे (त्यावेळी पक्ष मान्यता नसल्याने अपक्ष म्हणून नोंद) अशोकराव देशमुख यांनी निवडणूक लढवत तब्बल २ लाख २९ हजार ५६९ (४४.२१ टक्के) मते मिळवित विजय संपादित केला होता. त्यानंतर शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता मिळाली. दोनच वर्षात म्हणजेच १९९१ मध्ये पुन्हा झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत चिन्हावर अशोकराव देशमुख यांनी निवडणूक लढविली आणि पुन्हा ते २० हजार १६१ मतांनी विजयी झाले. १९८९ पासून सुरु झालेली शिवसेनेची विजयी घोडदौड १९९८ मधील १३ महिन्यांचा कालावधी वगळता ३० वर्षांपासून सातत्याने सुरु आहे. आतापर्यंत तब्बल ७ वेळा पक्षाला विजय मिळवून देत शिवसेनेच्या इतिहासात सुवर्ण क्षणांची नोंद करणाºया परभणीला आतापर्यंत पक्षाकडून काहीही मिळालेले नाही. तसा प्रयत्नही मातोश्रीकडून आतापर्यंत झालेला नाही. परिणामी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या वाट्याला अनेकदा विरोधकांचे उपाहासात्मक बोलणे खावे लागले. तरीही स्थानिक पदाधिकाºयांनी मातोश्रीवर चकार शब्द काढला नाही; परंतु, असे किती दिवस न मागता निमूटपणे पक्षासाठी योगदान द्यायचे, असा सवाल आता परभणीकर स्थानिक प्रतिनिधींना विचारु लागले आहेत. परभणीकर शिवसेनेला भरभरुन देतात मग शिवसेनेने परभणीकरांना आता उदात्त हेतूने भरभरुन का देऊ नये, असाही सवाल केला जात आहे.
नेत्यांनी पक्ष सोडला तरी शिवसेनेचा दबदबा कायम
३० वर्षाच्या कालावधीत अनेकांना पक्षामुळे सन्मानाची पदे मिळाली. त्यानंतर ही अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली; परंतु, परभणीकरांनी मात्र शिवसेनेची साथ सोडली नाही. केंद्रात किंवा राज्यात कोणाचीही सत्ता असो परभणी शिवसेनेचीच, हे समीकरण कायम राहिले आहे. यामध्ये नवनिर्वाचित खा.संजय जाधव यांचाही मोलाचा वाटा आहे. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल ४९.७७ टक्के मते मिळवित विजय संपादन केला होता. तर २०१९ च्या निवडणुकीत तब्बल १५ आजी-माजी लोकप्रतिनिधी विरोधात असताना एकाकी किल्ला लढवत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावरील भगवा ध्वज खाली उतरु दिला नाही व पक्षाला सन्मानाचा विजय मिळवून दिला. या विजयाची दखल घेऊन शिवसेनेनेही आता जाधव यांच्या रुपाने परभणीकरांना न्याय देण्याची वेळ आली आहे.