परभणी : एमपीएससीत शेतकऱ्याच्या मुलाची झेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:16 AM2019-02-18T00:16:24+5:302019-02-18T00:16:50+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये सोनपेठ तालुक्यातील धामोनी येथील शेतकरी प्रकाशराव मुळे यांचा मुलगा सखाराम राज्यात पाचवा आला आहे़ सखाराम मुळे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये सोनपेठ तालुक्यातील धामोनी येथील शेतकरी प्रकाशराव मुळे यांचा मुलगा सखाराम राज्यात पाचवा आला आहे़ सखाराम मुळे यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आहे़
जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर आपण ध्येय प्राप्त करू शकतो, असे सखाराम मुळे यांनी या यशानंतर सांगितले़ सोनपेठ तालुक्यातील धामोणी या छोट्या गावातून सखाराम मुळे यांनी माध्यमिक आश्रम शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले़ त्यानंतर परभणीतील शिवाजी महाविद्यालयातून बारावी आणि पुढे सांगली येथे अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले़ सुरुवातीपासूनच स्पर्धा परीक्षेकडे ओढा असल्याने या परीक्षेच्या तयारीसाठी पुणे गाठले़ वडील शेतीचा व्यवसाय करतात़ मुलाची शिक्षणाची ओढ लक्षात घेऊन त्यांनीही सखाराम यांना सर्वतोपरी मदत केली़ विशेष म्हणजे २०१७ मध्येच झालेल्या परीक्षेत सखाराम मुळे यांनी यश मिळविले़ या परीक्षेतून जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची निवड झाली आहे़ एवढ्यावर न थांबता त्यांनी एमपीएससीची तयारी सुरूच ठेवली होती़ २०१८ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली़ या परीक्षेत त्यांनी राज्यातून पाचवा क्रमांक पटकावला असून, उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली आहे़ सखाराम मुळे यांच्या यशामुळे आई, वडिलांचे स्वप्न साकार झाले असून, सखाराम मुळे यांचे हे यश ग्रामीण भागातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे़
योग्य मार्गदर्शन आवश्यक
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे़ त्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अनुभव जाणून घेतले पाहिजेत़ त्यानंतर दररोज अभ्यासातील सातत्य, अभ्यासाचे योग्य नियोजन आणि परिश्रमपूर्वक मेहनत घेण्याची तयारी ठेवली तर ते या परीक्षेत निश्चित यशस्वी होतील, असे सखाराम मुळे यांनी सांगितले़