परभणीत व्याख्यान : जीडीपी वाढविण्यासाठी ग्रामीण भागास प्राधान्य द्या- अनिल काकोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 12:16 AM2018-01-22T00:16:41+5:302018-01-22T00:16:56+5:30
देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : देशातील लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत़ देशाचा जीडीपी वाढवायचा असेल तर ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे़ शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन अणूशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर यांनी केले़
येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्वयंसहाय्यता बचत गटाच्या वतीने २१ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात ‘नव्या युगाकडे वाटचाल’ या विषयावर एकदिवसीय विवेक व्याख्यानसत्राचे आयोजन करण्यात आले होते़ या प्रसंगी अणुशास्त्रज्ञ डॉ़ अनिल काकोडकर बोलत होते़ अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ़बी़ व्यंकटेस्वरलू यांची उपस्थिती होती़ डॉ़ काकोडकर म्हणाले, भारत देश महासत्ता बनावा हे प्रत्येक तरुणाचे स्वप्न आहे़ परंतु, देशातील तरुण त्यासाठी झटताना दिसून येत नाही़ इतर देश तंत्रज्ञानाच्या बळावर पुढे आले आहेत़ विकसित देशांनी तयार केलेले तंत्रज्ञान इतर देशांना निर्यात करून मोठ्या प्रमाणात संपत्ती कमावली आहे़ परंतु, आपल्या देशातील ग्रामीण भागात सोयी, सुविधा व तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत, ते होत नाहीत़
केवळ शहरी भागातच नवनवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता करून जीडीपीचा विचार करण्यात येतो़ परंतु, देशाच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश नागरिक ग्रामीण भागात वास्तव्य करतात़ त्यामुळे सरकारने शहराबरोबरच ग्रामीण भागासाठी नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत, तरच देशाचा जीडीपी वाढण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले़
या कार्यक्रमाचे आयोजन आनंद देशमुख, श्रीपाद देशपांडे, संदीप पौळ, रविशंकर झिंगरे यांनी केले होते. या व्याख्यानास शहरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती़