परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणूक ; राजकीय खलबते सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:31 AM2018-04-28T00:31:52+5:302018-04-28T00:31:52+5:30

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी एकाही राजकीय पक्षाने उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा केली नसल्याने जिल्हाभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अशातच उमेदवारांच्या अनिश्चितेवरुन मतदारांमध्येही चलबिचल निर्माण झाली आहे.

Parbhani - Legislative council elections in Hingoli; Continuing government purchases | परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणूक ; राजकीय खलबते सुरूच

परभणी- हिंगोली विधान परिषद निवडणूक ; राजकीय खलबते सुरूच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर होऊन आठ दिवसांचा कालावधी लोटला तरी एकाही राजकीय पक्षाने उमेदवाराची अधिकृतपणे घोषणा केली नसल्याने जिल्हाभरात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. अशातच उमेदवारांच्या अनिश्चितेवरुन मतदारांमध्येही चलबिचल निर्माण झाली आहे.
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २१ एप्रिल रोजी जाहीर झाला. सद्यस्थितीत या मतदारसंघाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.बाबाजानी दुर्राणी हे करीत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होती. त्यानुसार लातुरात काँग्रेसचे आ. दिलीपराव देशमुख निवडून आले होते. तर परभणी- हिंगोलीत राष्ट्रवादीचे आ.दुर्राणी विजयी झाले होते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत आ.दुर्राणी यांनाच पुन्हा राष्ट्रवादीकडून उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. परंतु, लातुरात आ.दिलीपराव देशमुख यांनी तरुणांना संधी देणार असल्याचे सांगितल्यानंतर परभणीतील जागेच्या चर्चेला तोंड फुटले. लातुरात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपाची ताकद यावेळेला वाढली आहे. या उलट परभणी- हिंगोलीत भाजपाची फारसी ताकद नाही. दोन जिल्ह्यात मिळून केवळ ५१ मतदारांवर निवडणुकीच्या आखाड्यात विजय मिळविण्याचे भाजपा नेत्यांचे मनसुबे असून नेहमीप्रमाणे शिवसेना ९७ सदस्यांसह मदतीला येईल आणि अपक्ष, इतर छोटे राजकीय पक्ष व काँग्रेस- राष्ट्रवादीतील नाराजांची मोट बांधून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करुत, असे स्वप्न भाजपा नेत्यांकडून दिवसा पाहिले जात आहे. अशातच शिवसेनेने ‘एकला चलो रे’ चा नारा दिल्याने भाजपा नेत्यांचा तुर्तास तरी स्वप्नभंग झाला आहे. अशात जिल्ह्यातील भाजपा नेत्यांमध्ये उमेदवारीवरुन अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. परभणी महानगरपालिकेत महापौरांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला सर्वप्रथम मतदान करणारा एक गट आणि ग्रामीण भागातील इतर पक्षातून आलेल्या सहकाऱ्यांना एकत्रित करुन विजयाचे स्वप्न पाहणारा दुसरा गट सक्रिय झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील भाजपाच्याच २० सदस्यांना कोणीकडे जावे, असा प्रश्न पडला आहे. अशातच शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार दिल्यास भाजपा पुढील अडचणी वाढणार आहेत. उमेदवारीबाबत शिवसेनेची ‘एकला चलो रे’ ची भूमिका कायम राहते की, राज्य सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची नेहमी धमकी देण्यासारखी भूमिका कायम राहते, यावरही बरेच अवलंबून राहणार आहे. प्रारंभी स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा करुन ऐनवेळी घुमजाव करीत युतीचा धर्म म्हणून शिवसेना जुळते घेईल, असेही राजकीय जाणकारांना वाटते.
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीत जागा वाटपावरुन अंतर्गत शीतयुद्ध सुरु आहे. पूर्वी परभणी- हिंगोलीची जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे ती काँग्रेसलाच साभार परत मिळावी, असे जिल्ह्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. तर काही नेत्यांचा विधानसभा निवडणुकीवर डोळा असल्याने त्यांना राष्ट्रवादीकडेच जागा असावी वाटते. राष्ट्रवादीतही दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. गेल्या पाच वर्षातील आ.दुर्राणी यांची कामगिरी पाहता व वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असलेला त्यांना सलोखा पाहता आ.दुर्राणी यांना उमेदवारीसाठी फारसी अडचण येणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. असे असले तरी सद्यस्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीकडे एकूण २९७ सदस्यांचे पाठबळ आहे. त्यातील जवळपास ३० सदस्य हे आघाडीतून फुटून भाजपाच्या गोट्यात जाण्याची शक्यता आहे; परंतु, विरोधी पक्षातील काही सदस्य फुटून ते आघाडीच्या उमेदवाराला मदत करु शकतात. त्यामुळे संख्याबळाचा विचार केला तर शिवसेना-भाजपाच्या एकूण १४८ सदस्यांच्या तुुलनेत काँग्रेस- राष्ट्रवादीचे २९७ संख्याबळ वरचढ आहे. याशिवाय स्थानिक पातळीवरील काही अपक्ष, आघाड्यांच्या सदस्यांचे तळ्यात-मळ्यात सुरुच असते.
दोन दिवसांत एकही अर्ज नाही
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. असे असले तरी गेल्या दोन दिवसांत एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केलेला नाही. परंतु, शुक्रवारी ७ अर्ज इच्छुकांनी नेले आहेत. ३ मे पर्यत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर ४ मे रोजी आलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. ७ मेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. २१ मे रोजी मतदान होणार आहे.
बैठका अन् रणनीतीची आखणी...
उमेदवारांची घोषणा झाली नसली तरी दोन्ही बाजुंनी संबंधित इच्छुकांनी बैठका घेऊन रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे, महानगरजिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आ.विजय गव्हाणे यांनी नुकतीच मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन परभणीतील उमेदवारीवर चर्चा केली. त्यामध्ये कोणता उमेदवार दिल्यास पक्षाला विजय मिळविणे सोपे जाईल, यावर खल झाल्याचे समजते. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीतही बैठका अन् रणनिती आखणे सुरु आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची निवड प्रक्रिया रविवारी होणार असल्याने या प्रक्रियेकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या निवडीनंतर उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकते. एकीकडे राज्यपातळीवर या घडामोडी सुरु असताना जिल्हा पातळीवरही काही नगरसेवक व इच्छुकांमध्ये विविध ठिकाणी बैठका सुरु आहेत.
शिवसेनेचे बाजोरिया यांनी घेतल्या नेत्यांच्या गाठी-भेटी
शिवसेनेने काही दिवसांपूर्वी राज्यस्तरावर स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर परभणी- हिंगोली विधानपरिषद मतदारसंघातही शिवसेना स्वतंत्र उमेदवार देणार असल्याची चर्चा सुरु असताना अकोल्यातील शिवसेनेचे आ.गोपीकिशन बाजोरिया यांचे पूत्र विप्लव बाजोरिया यांनी शुक्रवारी आ.डॉ.राहुल पाटील, खा.बंडू जाधव यांची भेट घेतली. पक्षाकडून त्यांना उमेदवारी देणे जवळपास निश्चित झाल्याचे त्यांनी या भेटी दरम्यान सांगितले. जिल्ह्यातील शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांची लवकरच बैठक घ्यावी, अशी विनंतीही यावेळी बाजोरिया यांनी केली असल्याचे समजते. खा.जाधव व आ.पाटील या दोन्ही नेत्यांनी बाजोरिया यांच्याशी चर्चा केली. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, त्यानुसार जिल्ह्यात काम केले जाईल, असे या नेत्यांनी त्यांना सांगितल्याचे समजते. एकीकडे बाजोरिया हे आपणालाच पक्षाने उमेदवारी दिल्याचे सांगत असताना दुसरीकडे शिवसेनेने मात्र अधिकृतपणे उमेदवाराची घोषणा केली नाही, हे विशेष होय.
दरम्यान, बाजोरिया यांना परभणीत पाठवून शिवसेनेकडून भाजपावर एक प्रकारे दबाव आणण्याचाही प्रयत्न असू शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळातून होताना दिसून येत आहे.
उमेदवारीबाबत होईना निर्णय
परभणी- हिंगोली विधानपरिषद मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे येणार की राष्ट्रवादीकडे कायम राहणार, याबाबत अधिकृत निर्णय दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जाहीर केलेला नाही. परंतु, काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी या निवडणुकीत कायम राहील, हे मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी राज्यस्तरावर जाहीर केल्याने जो काही निर्णय होईल, तो सामंजस्यानेच होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. लातूरची जागा काँग्रेसकडेच राहून तेथे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याच नातेवाईकांना उमेदवारी मिळेल, असा लातुरकरांचा अंदाज आहे. असे झाले तर परभणीची जागा राष्ट्रवादीकडेच राहील. त्यानंतर सहाजीकच आ.दुर्राणी यांचेच नाव उमेदवारीसाठी आघाडीवर राहील. भाजपामध्येही उमेदवारीवरुन अंतर्गत शीतयुद्ध सुरु झाले आहे. या पक्षात एका इच्छुकाच्या पाठीमागे संपर्कमंत्री बबनराव लोणीकर आहेत. तर दुसºया इच्छुकाच्या पाठीमागे आ.मोहन फड आहेत. त्यात जालन्याचे खा.रावसाहेब दानवे- लोणीकरांचे, राजकारण परभणीत आल्यास दानवेंच्या इच्छुकाचे पारडे जड होऊ शकते. असे असले तरी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन आठ दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही उमेदवारांचे नाव निश्चित झाले नसल्याने या निवडणुकीकडे डोळे लावून बसलेल्या मतदारांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.

Web Title: Parbhani - Legislative council elections in Hingoli; Continuing government purchases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.