परभणी: चौदा मंडळांमध्ये तीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 11:58 PM2019-08-26T23:58:26+5:302019-08-26T23:58:48+5:30
यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : यावर्षीच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत २८६ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यातील ३९ मंडळांपैकी १४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ त्यामुळे या मंडळात समाविष्ट असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़
मागील वर्षी परतीचा पाऊस झाला नाही़ त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासून जिल्हावासिय दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहेत़ यावर्षीच्या पावसाळ्यात नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, पावसाने जिल्ह्याकडे पाठ फिरविली़ परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७४ मिमी एवढी असून, पावसाळ्यातील अडीच महिने संपल्यानंतर सरासरी ३७ टक्के पाऊस झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने घेतली आहे़ १ जून ते २५ आॅगस्टपर्यंत जिल्ह्यात ५०८ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते़ प्रत्यक्षात २८६़८४ मिमी पाऊस झाला आहे़ त्यामुळे अपेक्षित पावसाच्या तुलनेतही ४४ टक्के पावसाची तूट आहे़ या पावसाळ्यातील महत्त्वाची नक्षत्रे संपली असून, सद्यस्थितीला जिल्ह्यात दुष्काळीसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ जिल्ह्यात एकूण ३९ मंडळे असून, या मंडळांमध्ये झालेल्या पावसाची नोंद महसूल प्रशासनाकडून घेतली जाते़ ३९ मंडळांपैकी १४ मंडळांत ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.़ परभणी तालुक्यातील परभणी शहर, परभणी ग्रामीण, सिंगणापूर, दैठणा, पिंगळी आणि जांब या मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे़ पालम तालुक्यात चाटोरी, सेलू तालुक्यात कुपटा, वालूर, चिकलठाणा, पाथरी तालुक्यात बाभळगाव, हादगाव, जिंतूर तालुक्यात जिंतूर, बोरी, चारठाणा, आडगाव आणि मानवत तालुक्यात केकरजवळा या मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे़ या पावसाळी हंगामात झालेला पाऊस केवळ पिकांना दिलासा देणारा ठरला़ एकही मोठा वाहवनी पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील सर्व प्रकल्प कोरडेठाक आहेत़ परिणामी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़
चुडावा मंडळात सर्वाधिक पाऊस
४पूर्णा तालुक्यातील चुडावा मंडळामध्ये सर्वाधिक ६७़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ या मंडळात सरासरी ८०४ मिमी पाऊस होतो़
४आतापर्यंत ५४५ मिमी पाऊस मंडळामध्ये झाला आहे़ त्याचप्रमाणे १ जून ते २५ आॅगस्ट या काळात या मंडळात ५०९़५६ मिमी पाऊस होणे अपेक्षित होते़ प्रत्यक्षात ५४५ मिमी म्हणजे अपेक्षित पावसाच्या १०७ टक्के पावसाची नोंद झाली आहे़
बोरी मंडळात सर्वात कमी पाऊस
१४ मंडळांमध्ये ३० टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असली तरी जिंतूर तालुक्यातील बोरी मंडळात जिल्ह्यातील सर्वात कमी म्हणजे २०़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ या मंडळामध्ये सरासरी ८११़७० मिमी पाऊस होतो़ प्रत्यक्षात १६९ मिमी पाऊस मंडळात झाला असून, सरासरीच्या तुलनेत केवळ २० टक्के पावसाची नोंद झाली आहे़ त्यानंतर पाथरी तालुक्यातील हादगाव मंडळात २३़८ टक्के, सेलू तालुक्यातमील चिकलठाणा मंडळात २४़५ टक्के तर परभणी ग्रामीण मंडळामध्ये २५ टक्के पाऊस झाला आहे़
परतीच्या पावसाकडे डोळे
४जिल्ह्यात पावसाळी हंगामात मोठा पाऊस झाला नाही़ झालेला पाऊस केवळ पिकांसाठी जीवदान देणारा ठरला असून, पावसातील खंडही शेतकऱ्यांना चिंतेचा ठरत आहे़
४सद्यस्थितीला दोन आठवड्यांपासून पाऊस गायब झाला असून, पिके कोमेजत आहेत़ तर दुसरीकडे प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने एकाही प्रकल्पामध्ये समाधानकारक पाण्याची आवक झाली नाही़ यामुळे या भागात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे़
४गतवर्षी मृतसाठ्यात असलेले प्रकल्प अजूनही बाहेर पडले नाहीत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघण्यासाठी मोठ्या पावसाची आवश्यकता असून, नागरिकांच्या नजरा परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत़