परभणी : जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 11:59 PM2020-01-01T23:59:42+5:302020-01-01T23:59:55+5:30
शहरातून जाणाऱ्या गंगाखेड ते लोहा या मार्गावर गंगाखेड आगाराकडून मागील अनेक दिवसांपासून खिळखिळ्या झालेल्या बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बसमुळे वाहक व प्रवाशांचे अनेकदा खटके उडाल्याचेही प्रकार समोर आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): शहरातून जाणाऱ्या गंगाखेड ते लोहा या मार्गावर गंगाखेड आगाराकडून मागील अनेक दिवसांपासून खिळखिळ्या झालेल्या बसचा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. बसमुळे वाहक व प्रवाशांचे अनेकदा खटके उडाल्याचेही प्रकार समोर आले आहेत.
गंगाखेड ते लोहा या मार्गावर नेहमीच प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ सुरू असते. तसेच पालम शहरातून हा रस्ता जात असल्याने प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत प्रवासी एसटी महामंडळाच्या बसकडे जातात. चांगली सेवा मिळेल ही आशा प्रवाशांना असते; परंतु गंगाखेड आगाराच्या गलथान कारभाराचा फटका या मार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांना नेहमीच बसत आहे.
मागील महिनाभरापासून बस क्रमांक एम.एच. २२ यु- ९९३३ ही या मार्गावर गंगाखेड ते लोहा शटल सेवा म्हणून फेºया मारत आहे. या बसवरील पत्रे जागोजागी तूटून गेल्याने प्रवाशांच्या अंगावर कधी पडेल याचा नेम राहिलेला नाही. तसेच खिडक्या तुटल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घेऊनच प्रवास करावा लागत आहे. बस चालू होताच मोठा आवाज येत असल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण होत आहे.
या बसच्या अवस्थेला गंगाखेड आगार जबाबदार असूनही याकडे दुर्लक्षही केले जात आहे. प्रवास करणारे प्रवासी मात्र वाहकाशी वाद घालत असल्याने बसमध्ये गोधळ निर्माण होत आहे.
१ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता ही बस गंगाखेडकडून निघाल्यानंतर प्रवाशांनी बसमध्ये मोठा गोंधळ घातला होता. वारंवार तक्रार करूनही नादुरुस्त बस या मार्गावर चालवली जात आहे.
विभागीय नियंत्रकांनी याकडे लक्ष देवून दुरुस्त बसेस पालम तालुक्यासाठी सोडाव्यात, अशी मागणी होत आहे.
खिळखिळ्या बसेस्: प्रवाशांच्या तक्रारीकडे दूर्लक्षच
४परभणी जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर पालम तालुका वसलेला आहे. या तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर अपेक्षित विकास मात्र झालेला नाही. एस.टी. महामंडळाचे जिल्ह्यामध्ये चार आगार आहेत. यामध्ये परभणी, पाथरी, जिंतूर, गंगाखेड या आगाराचा समावेश आहे. गंगाखेड आगारातून पालम तालुक्यात बसेस सोडण्यात येतात व त्यावर नियंत्रण ठेवण्यात येते; परंतु पालम तालुक्यासाठी सोडण्यात येणाºया बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत. याबाबत प्रवाशांनी अनेकवेळा एस.टी. महामंडळ प्रशासनाकडे तक्रारी केल्या; परंतु गंगाखेड आगार प्रमुखाचे दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या तक्रारीला आगार प्रमुखांनी खो दिल्याची भावना निर्माण होत आहे.
आगारप्रमुखांचे दूर्लक्ष
४गंगाखेड आगारातून नादुरुस्त बसेस रस्त्यावरुन धावत आहेत. याबाबत अनेक वेळा प्रवाशांनी आगारप्रमुख व बसस्थानक प्रमुखांकडे तक्रारी केल्या; परंतु आगारप्रमुखांचे दूर्लक्ष झाल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विभागीय नियंत्रक मुक्तेश्वर जोशी यांनी तात्काळ लक्ष देवून प्रवाशांना सुस्थितीत असलेल्या बसेस सोडण्यात याव्यात व प्रवाशांची होणारी गैरसोय टाळावी, अशी मागणी आहे.