परभणी : तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात भुरभूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:03 AM2019-07-29T00:03:40+5:302019-07-29T00:03:57+5:30
शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे़ रविवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस झाला आहे़ या पावसाने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे़ रविवारी जिल्ह्यात मोठा पाऊस झाला नसला तरी दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक भागामध्ये रिमझिम पाऊस झाला आहे़ या पावसाने खरिप पिकांना दिलासा मिळाला आहे़
दीड महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर परभणी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली़ जिल्हाभरात सर्वदूर भीज पाऊस झाल्याने शेतकरी सुखावले आहेत़ शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस रिमझिम पावसामुळे प्रथमच पावसाळी वातावरण जिल्हावासियांना अनुभवायास मिळाले़ या पावसामुळे कापूस, सोयाबीन या पिकांना दिलासा मिळाला आहे़ दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने ही पिके माना टाकत होती़
ऐनवेळी पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला आहे़ रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२़९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पाथरी तालुक्यात सर्वाधिक २५ मिमी, मानवत तालुक्यात २३़३३ मिमी, परभणी १४़५०, सेलू १४़८०, पूर्णा १३, पालम ८, सोनपेठ ६़५०, गंगाखेड ५़७५ आणि जिंतूर तालुक्यात ५़६७ मिमी पाऊस झाला आहे़
१ जूनपासून आतापर्यंत अपेक्षित पावसाच्या प्रमाणात केवळ ५५ टक्के पाऊस झाला आहे़ मानवत तालुक्यात सर्वाधिक ६९़२ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ २२ टक्के पाऊस झाला आहे़ मानवत तालुक्यात सर्वाधिक २७़७ टक्के पावसाची नोंद झाली आहे़ मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
पिके तगली; पाण्याचा प्रश्न कायम
४जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पिकांना काही दिवसांपुरता दिलासा मिळाला आहे़ या पावसाने खरीप पिकांच्या उत्पादनात थोडीफार भर पडेलही़ परंतु, जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही़
४धरणामध्ये पाणीसाठा होईल, असा पाऊस झाला नाही़ परभणी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत़ आजपर्यंत झालेल्या पावसामुळे या प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली नसल्याने पाण्याचा प्रश्न कायम आहे़ जिल्हावासियांना आगामी उन्हाळ्यातील पाण्याची चिंता लागलेली आहे़