परभणी : हमीभावाने तूर खरेदीला १९ क्विंटलची मर्यादा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:14 AM2018-03-05T00:14:50+5:302018-03-05T00:21:17+5:30
जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात शासकीय हमीभावाने तूर खरेदी सुरू झाली असली तरी प्रती हेक्टरी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घातल्याने उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे़
खरीप हंगामातील तुरीचे पीक जिल्ह्यात बहरात आले होते़ त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पन्न झाले आहे़ मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही तुरीचे विक्रमी उत्पादन झाले आहे़ त्यामुळे तूर उत्पादकांच्या आशा वाढल्या आहेत़ मात्र शेतकºयांची फरफट अजूनही सुरूच आहे़ दोन महिन्यांपासून तूर विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होत आहे़ परंतु, शासनाने हमीभाव तूर खरेदी केंद्र वेळेत सुरू केले नाहीत़ याचा फायदा घेत व्यापाºयांनी कवडीमोल दराने तुरीची खरेदी केली़ शासनाने तुरीसाठी ५ हजार ४५० रुपये हमीभाव जाहीर केला असताना खुल्या बाजारपेठेत मात्र ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे तुरीची खरेदी झाली़ त्यामुळे सुरुवातीचे दोन महिने शेतकºयांना क्विंटलमागे १२०० रुपयांचा फटका सहन करावा लागला़ आर्थिक विवंचनेत असलेल्या अनेक शेतकºयांनी खुल्या बाजारात तूर विक्रीलाही घातली़
दरम्यान, हमीभाव खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने शेतकºयांची ओरड वाढली़ ही बाब लक्षात घेऊन शासनाने फेबु्रवारी महिन्यात खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला़ मात्र हे केंद्र सुरू करीत असताना देखील अनेक नियम व अटी घालण्यात आल्या़ शेतकºयांना थेट तूर विक्रीची मुभा दिली नाही़ तूर विक्रीसाठी सुरुवातीला नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले़ नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केली जात आहे़ त्यातही अनेक त्रुटी आहेत़ शासनाने केवळ नोंदणीकृती शेतकºयांचीच तूर खरेदी करीत असताना खरेदी संदर्भातही अटी घातल्या आहेत़ त्यात परभणी जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रांवर १ हेक्टर शेत जमिनीसाठी केवळ १९ क्विंटल तूर खरेदी करण्याची मर्यादा घालण्यात आली आहे़ परभणी जिल्ह्यात यावर्षी खरीप हंगामात निसर्गाची साथ लाभली़ मुबलक पाणीही उपलब्ध झाले होते़ सर्वसाधारणपणे एकरी १० क्विंटलपर्यंत तुरीचे उत्पादन होते़ हेक्टरचा हिशोब केला तर २५ क्विंटलपर्यंत हेक्टरी उत्पादन मिळते़ त्यामुळे बहुतांश शेतकºयांना उत्पादन अधिक झाले असतानाही मर्यादेतच तूर घालावी लागत आहे़ खुल्या बाजारात तुरीला भाव मिळत नाही़ त्यामुळे चांगले उत्पादन होवूनही नुकसान सहन करण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे़
नऊ हजार : क्विंटल तुरीची खरेदी
जिल्ह्यात ७ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ त्यात नाफेडचे ६ आणि विदर्भ फेडरशेनच्या एका केंद्राचा समावेश आहे़ विशेष म्हणजे, जिल्ह्यात तुरीचे उत्पादन भरपूर झाले आहे आणि हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले असताना विक्रीसाठी मात्र गर्दी होत नसल्याचे दिसत आहे़ आतापर्यंत या हमीभाव केंद्रांवर ९ हजार क्विंटलपर्यंतची तूर खरेदी करण्यात आली आहे़ शासनाच्या नियम व अटींमुळे तूर खरेदीत अडथळे निर्माण होत आहेत़ खरेदी केंद्रामार्फत दररोज शेतकºयांना संदेश देऊन बोलावून घेतले जाते़ परंतु, काही कारणास्तव शेतकरी खरेदी केंद्रावर पोहचले नाही तर त्यांचे नुकसानच होत आहे़ तसेच केंद्र चालकांचा वेळ वाया जात आहे़
खुल्या बाजारात मोठी खरेदी
हमीभाव केंद्रांवर ५ हजार ४५० रुपयांचा भाव मिळत असला तरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मात्र त्यापेक्षा कमी दराने तुरीची खरेदी झाली आहे़ तीही केंद्राच्या तुलनेत कितीतरी पटीने अधिक आहे़ त्यामुळे हमीभाव मिळूनही शेतकºयांना आर्थिक फटका सोसावा लागत आहे़