परभणी : बोगस सातबाराच्या आधारावर कर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:20 AM2018-10-07T00:20:47+5:302018-10-07T00:21:29+5:30
अस्तित्वात नसलेल्या शेत जमिनीची बोजा असलेली सातबारा बदलून व बनावट सातबाराच्या आधारावर पीक कर्ज उचलून महाराष्ट्र ग्रामीण बँकेला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दडपण्याचा बँक प्रशासनाचा प्रयत्न दिसत आहे.
परभणी : बोगस सातबाराच्या आधारावर कर्ज वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): अस्तित्वात नसलेल्या शेत जमिनीची बोजा असलेली सातबारा बदलून व बनावट सातबाराच्या आधारावर पीक कर्ज उचलून महाराष्ट्र ग्रामीण बँकेला लाखो रुपयांचा गंडा घालण्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार दडपण्याचा बँक प्रशासनाचा प्रयत्न दिसत आहे.
बँकेच्या वतीने पीक कर्ज वाटप करताना असे प्रकार घडले आहेत. हे प्रकार मागील एक ते दीड वर्षापासून सुरु आहेत. तालुक्यातील कोरवाडी, दहेगाव यासह ८ ते १० गावांत हा प्रकार घडला आहे. आॅनलाईन सातबारा आणून बोजा उडवणे किंवा तलाठ्यामार्फत बिगर बोजा असलेली सातबारा घेऊन हे प्रकार केले आहेत. यात सातबारा देणारे महा-ई सेवा केंद्र व तलाठी यांचाही सहभाग असल्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात १०० पेक्षा जास्त शेतकरी व १ कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे केवळ पीक कर्जातच नव्हे तर इतर कर्जातही असा प्रकार घडल्याची चर्चा आहे. नेमके किती शेतकऱ्यांच्या बाबतीत असे घडले, यापैकी किती शेतकºयांनी पैसे परत केले, यामागे बँक प्रशासनाची भूमिका काय? आदी प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जिंतूर पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
जिंतूर तालुक्यातील कोरवाडी येथील एका महिलेने तिच्या नावाने जमीन नसतानाही दुसºयाची जमीन स्वत:च्या नावाने दाखवून त्याबाबत बनावट कागदपत्र तयार करुन ती कागदपत्रे पीक कर्ज उचलण्यासाठी बँकेत दाखल केली; परंतु, ही बनवाबनवी उघडकीस आली असून तलाठी उमेश वाकेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिंतूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तलाठी उमेश वाकेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १ आॅक्टोबर रोजी जिंतूर तहसील कार्यालयामध्ये फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी उपजिल्हाधिकारी परभणी, उपविभागीय महसूल अधिकारी, सेलू व तहसीलदार जिंतूर यांची ३ सदस्यीय समिती बसलेली असताना महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे शाखाधिकारी ए.एस.तोटे यांना तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी त्यांच्याकडे असलेल्या पीक कर्जाच्या फाईली घेऊन तहसील कार्यालयात बोलविले. पीक कर्जाच्या प्रस्तावाची पाहणी करताना तहसीलदार शेजूळ यांना कोरवाडी येथील कावेरा पांडु होगे या महिलेने दाखल केलेल्या प्रस्तावातील कागदपत्रांचा संशय आला. त्यावरुन त्यांनी या कागदपत्रांची शाहनिशा करण्यासाठी या सज्जाचे तलाठी उमेश वाकेकर व अभिलेखपाल अर्जून कांदे यांना आदेश दिले. त्यावरुन तलाठी व लेखापाल यांनी कावेरा पांडु होगे यांनी पीक कर्ज मिळविण्यासाठी जोडलेल्या कागदपत्रांची पाहणी केली असता गट नं.६० च्या सातबारा होल्डींगमधील मूळ खातेदार दत्ता रामा होगे क्षेत्र ९७ आर यांचे नाव कमी करुन त्या ठिकाणी कावेरा होगे यांनी स्वत:चे नाव टाकले. त्याच बरोबर क्षेत्रफळात वाढ करुन ते १ हेक्टर ९७ आर केले. तसेच सावित्रीबाई अंबादास होगे यांच्या मूळ सातबारावर असलेल्या १ हेक्टर २० आर या क्षेत्रफळात खाडाखोड करुन ते फक्त २० आर करण्यात आले. तसेच कावेरा होगे यांनी पीक कर्ज मिळविण्यासाठी जोडलेले होल्डींग व फेरफार प्रमाणपत्र बोगस असल्याचे दिसून आले. याबाबत तहसीलदार शेजूळ यांच्या आदेशावरुन तलाठी वाकेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन जिंतूर पोलीस ठाण्यात कावेरा होगे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार अनिसा सय्यद ह्या करीत आहेत.
दलालांची मोठी साखळी कार्यरत
महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अनेक प्रकरणे दलालांमार्फत दाखल होतात. बनावट सातबाराचे हे प्रकरण दलालांमार्फतच झाले. विशेष म्हणजे असे प्रकरण करीत असताना मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. काही शेतकºयांना तर कोणती सातबारा लावली, हे पण माहिती नाही. बँकेतील काही कर्मचारी व खाजगी व्यक्ती यांच्या संगनमताने हे फसवणूक प्रकरण होत असल्याचे समजते.
जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार गुन्हा
या संदर्भात बनावट सातबारा वापरुन पीक कर्ज घेतल्याची बाब जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांना कळवल्यानंतर त्यांनी तातडीने तहसीलदार शेजुळ यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार सुरेश शेजूळ यांनी दिली.