Parbhani Lok Sabha Consituency: परभणीतील मतदानकेंद्रावर ग्रामस्थांकडून पोलिसांना मारहाण; मतदान थांबले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 10:23 AM2019-04-18T10:23:39+5:302019-04-18T11:35:10+5:30
शेवडी हे गाव बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येते. या ठिकाणी लोकसभेसाठी शांततेत मतदान सुरु होते.
परभणी : मानवत तालुक्यातील शेवडी येथे मतदारांना सूचना करण्याच्या कारणावरून ग्रामस्थांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच पोलिसांच्या जीपचीही तोडफोड केली. यामध्ये पोलिस उपनिरिक्षक जखमी झाले आहेत. या प्रकारामुळे शेवडी येथील मतदान प्रक्रिया थांबली आहे.
शेवडी हे गाव बोरी पोलीस ठाण्यांतर्गत येते. या ठिकाणी लोकसभेसाठी शांततेत मतदान सुरु होते. पोलिसांनी मतदारांना रांगेत उभे राहण्याच्या तसेच मोबाईलवर न बोलण्याच्या सूचना केल्या. यावरून मतदार आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या वादातून ग्रामस्थांनी पोलिसांना मारहाण केली, तसेच त्यांच्या गाड्याही फोडल्या. तहसीलदार डी. डी. फुफाटे यांच्याशी संपर्क केला असता घटना घडल्याचा दुजोरा त्यांनी दिला.
मतदान प्रक्रिया सुरु झाली असून गावात तणावाचे वातावरण आहे. तहसीलदार डी डी फुफाटे, उपविभायीय पोलीस अधिकारी एकबोटे व अन्य अधिकारी गावात पोहोचले आहेत. या मारहाणीनंतर बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाने तैनात केलेल्या चार चाकी वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.
या दगडफेकीत चालक जखमी झाला असून शेवडी गावाला पोलिस छावनीचे स्वरुप आले आहे. घटना घडल्याने शेवडी जहांगीर येथील मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या रोडावली आहे. शेजारी असलेल्या पार्डी टाकळी गावातील ग्रामस्थांचे मतदानही या केंद्रावर असल्याने त्यांच्यामध्येही भीतीचे वातवरण पसरले आहे.