परभणीत लोकन्यायालय: तडजोडीने निकाली निघाली ७०८ प्रकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:48 AM2018-04-24T00:48:39+5:302018-04-24T00:48:39+5:30

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २२ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात ७०८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून २ कोटी ६३ लाख ८३ हजार ६५३ रुपयांची वसुली झाली आहे.

Parbhani Lokayat: 708 cases were settled by compromise | परभणीत लोकन्यायालय: तडजोडीने निकाली निघाली ७०८ प्रकरणे

परभणीत लोकन्यायालय: तडजोडीने निकाली निघाली ७०८ प्रकरणे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २२ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या लोकन्यायालयात ७०८ प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून २ कोटी ६३ लाख ८३ हजार ६५३ रुपयांची वसुली झाली आहे.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने २२ एप्रिल रोजी परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले होते. येथील जिल्हा न्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश उर्मिला जोशी- फलके यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोकन्यायालय घेण्यात आले. प्रबंधक पी.व्ही. काळे यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख अकबर शेख जाफर यांनी प्रास्ताविक केले.
या लोकन्यायालयात सर्व प्रकारचे तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, चलनक्षम दस्ताऐवज अधिनियमान्वये बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वेतन व भत्यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल प्रकरणे आणि दिवाणी स्वरुपाची प्रकरणे तसेच बँकेच्या वसुलीसाठी वादपूर्व दाखल झालेली प्रकरणे ठेवली होती.
या लोकन्यायालयात दिवाणी व फौजदारी अशा २६७ प्रकरणे तडजोडी आधारे निकाली काढण्यात आली असून त्यात १ कोटी ७५ लाख २३ हजार १८१ रुपयांची वसुली झाली आहे. तसेच वादपूर्व दाखल झालेली ४४१ प्रकरणे निकाली निघाली असून त्यामध्ये ८८ लाख ६० हजार ४७२ रुपये वसूल झाले आहेत. दिवसभरात एकूण ७०८ प्रकरणे निकाली निघाली असून २ कोटी ६३ लाख ८३ हजार ६५३ रुपयांची वसुली झाली.

Web Title: Parbhani Lokayat: 708 cases were settled by compromise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.