परभणी ; चारीचे पाणी शेतात घुसल्याने नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:38 AM2018-12-09T00:38:31+5:302018-12-09T00:38:37+5:30
निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लघू वितरिकांचे कामे अर्धवट असल्याने तसेच टेलच्या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने डुघरा शिवारातील शेतामध्ये घुसून शेतीचे नुुकसान होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात सोडण्यात आलेले पाणी लघू वितरिकांचे कामे अर्धवट असल्याने तसेच टेलच्या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने डुघरा शिवारातील शेतामध्ये घुसून शेतीचे नुुकसान होत आहे.
निम्न दुधना प्रकल्पाच्या लघू वितरिकेची अनेक कामे अर्धवट अवस्थेत आहेत. तर काही शिवारात ही कामे सुरू आहेत. २ डिसेंबर रोजी चारा पिकासाठी निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडण्यात आले; परंतु, कालव्याची झालेली तुटफूट व लघू वितरिकांच्या अर्धवट कामांंमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे.
डुघरा येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लघू वितरिका क्रमांक २७ च्या टेलच्या पाण्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्याने हे पाणी गट क्रमांक ३३ भागातील शेतात घुसले आहे. त्यामुळे शेतात मोठमोठे खड्डे पडले असून पाणी वाहत आहे.
डाव्या कालव्याच्या लघू वितरिकेचे काम बंद असल्याने या वितरिकेतून पाणी थेट गावाच्या रस्त्यावरून वाहत आहे. कालव्यात पाणी सोडल्यानंतर नेहमीच अशा प्रकारे शेतकºयांच्या शेतात पाणी घुसते. तसेच डुघरा गावच्या मुख्य रस्त्यावरून पाण्याचा प्रवाह कायम राहतो. टंचाईच्या काळात तरी संबंधित विभागाने पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. दरम्यान, यंदा दुष्काळ असल्याने दुधनात असलेले पाणी जपून वापरण्याची गरज आहे;परंतु, संबंधित कार्यालयाच्या कारभारामुळे डुघरा गावच्या रस्त्यावरून पाणी वाहून नासाडी होत आहे.
टेलपर्यंत पाणी जाण्यास अडथळे
४निम्न दुधना प्रकल्पाचा डावा कालवा ७० कि .मी.चा आहे. तर उजव्या कालव्याचे काम पूर्ण झालेले नाही.
४२ डिसेंबर रोजी पाणी कालव्यात सोडल्यानंतर अद्यापही पूर्ण क्षमतेने टेलपर्यंत पोहचले नसल्याची माहिती आहे. कारण अनेक ठिकाणी शेतकरी चाºयाद्वारे पाणी घेत असल्याने कालव्याच्या टेलपर्यंत पाणी संथ गतीने पोहचत आहे. संबंधित विभागाकडून पाणी सोडल्यानंतर टेलपर्यंत पूर्ण क्षमतेने पाणी पोहचविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर वितरिकेद्वारे पाणी देण्याचे नियोजन असते;परंतु, अनेक ठिकाणी चाºया फोडून पाणी घेतले जात असल्याने टेलपर्यंत पाणी पोहचण्यास अडथळे निर्माण होत असल्याची माहिती आहे. दरम्यान, १२ डिसेंबरपर्यंत पाण्याचा विसर्ग सुरू राहणार आहे.
प्रत्येक पावसाळ्यात कालव्यात पाणी सोडल्यानंतर डुघरा शिवारातील लघू वितरिकेच्या टेलचे पाणी माझ्या शेतातून वाहते. त्यामुळे शेतातील पिकांचे आणि जमिनीचे नुकसान होत आहे. सद्य स्थितीत या पाण्यामुळे शेतात नाला बनला आहे. अनेक वेळा संबंधित कार्यालयास याबाबतची माहिती दिली मात्र उपयोग झाला नाही.
-गोविंद मगर, शेतकरी, डुघरा