परभणी : अभिवादनासाठी लोटला जनसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:03 AM2019-04-15T00:03:49+5:302019-04-15T00:04:15+5:30
भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी भरगच्च कार्यक्रमाने साजरी करण्यात आली़ येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८़३० वाजेच्या सुमारास सामूहिक महावंदना, अभिवादन कार्यक्रम पार पडला़ या कार्यक्रमास जिल्हाभरातून हजारो उपासक, उपासिकांची उपस्थिती होती़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी भरगच्च कार्यक्रमाने साजरी करण्यात आली़ येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात सकाळी ८़३० वाजेच्या सुमारास सामूहिक महावंदना, अभिवादन कार्यक्रम पार पडला़ या कार्यक्रमास जिल्हाभरातून हजारो उपासक, उपासिकांची उपस्थिती होती़
डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी विविध जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमांचे नियोजन केले होते़ शहरातील विविध भागांमध्ये सकाळपासूनच या कार्यक्रमांना सुरुवात झाली़ मागील काही वर्षांपासून शहरात सामूहिक वंदनेची परंपरा रुढ झाली आहे़ महावंदना सुकानू समितीच्या वतीने यावर्षीही सामूहिक महावंदनेचा कार्यक्रम आयोजित केला होता़ सकाळी ८़३० वाजेच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सामूहिक महावंदनेसाठी नागरिक एकत्र आले़ यावेळी भदंत डॉ़ उपगुप्त महास्थवीर यांनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले़ तसेच भदंत काश्यप थेरो, भंदत मुदितानंद थेरो, भंते प्रज्ञाबोधी, भंते पी़ धम्मानंद, भंते धम्मपाल, भंते पूर्णबोधी, भंते आनंद, भंते रोहन, भंते नागज्योती, भंते मोघलायन यांनी धम्मदेसना दिली़ उपस्थित नागरिकांनी एका सुरात धम्मवंदना म्हटली़ कार्यक्रमात अॅड़ गौतमदादा भालेराव, अमरदीप रोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़
तत्पूर्वी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ़ व्ही़व्ही़ वाघमारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले़ डी़आय़ पोटफोडे यांनी ध्वजवंदना दिली़ त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मानवंदना देण्यात आली़ समता सैनिक दलाच्या वतीनेही मानवंदना देण्यात आली़
यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने विविध प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली़ कार्यक्रमास जिल्हाभरातून उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़ कार्यक्रमस्थळी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांचे विविध विषयांवरील साहित्य, निळे ध्वज, पंचरंगी ध्वज आदी साहित्य विक्रीसाठी असलेल्या स्टॉल्सवर नागरिकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़
अभिवादनासाठी लागल्या रांगा
परभणी येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या़ दुपारी १२़३० वाजेपर्यंत अभिवादनासाठीच्या रांगा कायम होत्या़ जिल्हाधिकारी पी़ शिवशंकर, खा़ बंडू जाधव, आ़ डॉ़ राहुल पाटील, राकाँचे राजेश विटेकर, महापौर मीनाताई वरपूडकर, सभागृह नेते भगवान वाघमारे, माजी मंत्री सुरेश वरपूडकर, डॉ़ विवेक नावंदर, विजय वाकोडे, डी़एऩ दाभाडे, आनंद भरोसे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, भीमराव वायवळ, डॉ़ सिद्धार्थ भालेराव, भीमराव हत्तीअंबिरे, रविराज देशमुख, नागेश सोनपसारे, प्रा़ संजय जाधव, गौतम भराडे, रणजी मकरंद, नागेश सोनपसारे, डॉ़ संजय खिल्लारे, नगरेसवक अतुल सरोदे, अॅड़ यशपाल कदम, सुशील कांबळे, रामप्रसाद रणेर, आण्णा डिघोळे, अजय गव्हाणे, यशवंत खाडे, गजानन लव्हाळे, सिद्धार्थ भरोडे, डॉ़ विजय गायकवाड, विशाल जल्हारे, नवनाथ मुजमुले, आलमगीर खान, महेंद्र सानके, मिलिंद बामणीकर, प्रदीप वाव्हळे, संजय सारणीकर, लक्ष्मण जोगदंड, कचरू गोडबोले, रवि सोनकांबळे, प्रा़ अरुणकुमार लेमाडे, चंद्रकांत लहाने, अमोल गायकवाड, गणेश देशमुख, सचिन कांबळे, पंकज खेडकर, आकाश लहाने, प्रदीप वाव्हुळे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त तेजस माळवदकर आदींसह विविध विभागांचे अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, समाजबांधवांनी डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले़
परभणी शहरातून काढली सवाद्य मिरवणूक
४सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक जयंती उत्सव समित्यांची स्थापना झाली असून, या जयंती मंडळांनीही मिरवणूक काढली़ ही सर्व मंडळी शिवाजी चौक परिसरात एकत्र झाली़ मिरवणुकीमध्ये मंडळांनी सजीव देखाव्यांचे सादरीकरण केले होते़ ढोल, ताशांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ गुजरी बाजार, शिवाजी चौक या ठिकाणी विविध पक्ष, संघटना आणि महापालिकेच्या वतीने मंच उभारून मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचे स्वागत करण्यात आले़ रात्री उशिरापर्यंत शहरातील मुख्य रस्त्यांवरून मिरवणुका सुरू होत्या़