परभणीत अडीच हजार क्विंटल तुरीची केली खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 12:07 AM2018-02-22T00:07:54+5:302018-02-22T10:36:52+5:30
जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून, एक आठवड्यामध्ये केवळ २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे़ हमीभाव मिळत असतानाही तूर उत्पादक मात्र केंद्रावर तूर घालण्यासाठी उदासिन असल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव तूर खरेदी केंद्र सुरू झाले असून, एक आठवड्यामध्ये केवळ २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर शासनाने खरेदी केली आहे़ हमीभाव मिळत असतानाही तूर उत्पादक मात्र केंद्रावर तूर घालण्यासाठी उदासिन असल्याची परिस्थिती सध्या दिसत आहे़
परभणी जिल्ह्यात तुरीचे उत्पादक मोठ्या प्रमाणात झाले आहे़ शासनाने तुरीला ५ हजार ४५० रुपये प्रती क्विंटल एवढा हमीभाव जाहीर केला आहे़ प्रत्यक्षात परभणी जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्र उशिराने सुरू झाले़ साधारणत: १ ते दीड महिना हे केंद्र उशिरा सुरू झाल्याने तूर उत्पादकांची मोठी फरफट झाली़ घरात तूर येऊन पडली असताना हमीभाव खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतकºयांना नाईलाजाने खाजगी बाजारात तुरीची विक्री करावी लागली़ शासनाने तुरीसाठी ५ हजार ४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला असला तरी खुल्या बाजारपेठेत मात्र जास्तीत जास्त ४ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल या दराने तूर खरेदी करण्यात आली़ त्यामुळे तूर उत्पादकांना क्विंटल मागे तब्बल १ ते दीड हजार रुपयांचा फटका सहन करावा लागला़ हमीभाव खरेदी केंद्रासाठी शेतकºयांची ओरड वाढत असल्याने फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात ५ ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत़ पहिले केंद्र परभणी येथे ७ फेब्रुवारी रोजी सुरू झाले तर गंगाखेड तालुक्यात १५ फेब्रुवारी रोजी हमी भाव खरेदी केंद्रावर खरेदीला सुरुवात करण्यात आली़ पाचही खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २२८ शेतकºयांची २ हजार ४५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ १ कोटी ३३ लाख ६० हजार ६७५ रुपयांची तूर शासनाने खरेदी केली आहे़
जिल्ह्यात सुमारे साडेतीन हजार शेतकºयांनी प्रशासनाकडे नोंदणी केली आहे़ त्या तुलनेत या आठ दिवसांत केवळ २२८ शेतकºयांची तूर खरेदी झाली़ नवीन पद्धतीनुसार नोंदणी केलेल्या शेतकºयांचीच तूर खरेदी केली जाणार आहे़ शासकीय तूर खरेदी केंद्राच्या वतीने तूर उत्पादकांना प्रत्येक दिवशी मोबाईलवर संदेश देऊन तूर विक्रीसाठी आणण्याचे सूचित केले जात आहे़ परंतु, तूर उत्पादक मात्र त्या तुलनेत प्रतिसाद देत नसल्याचे दिसत आहे़
हमीभाव खरेदी केंद्रावर बाजारपेठेच्या तुलनेत चांगला भाव मिळत असतानाही उत्पादकांनी मात्र पाठ फिरविली आहे़ अनेक शेतकºयांनी नोंदणीची झंजट नको म्हणून खुल्या बाजारपेठेतच तुरीची विक्री केली आहे़ त्यामुळे हमीभाव खरेदी केंद्रावर अजूनही तुरीच्या खरेदीला उठाव मिळेनासा झाला आहे़
गंगाखेडमध्ये सर्वाधिक तूर खरेदी
जिल्ह्यात परभणी, जिंतूर, गंगाखेड, सेलू आणि पूर्णा या पाच ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले आहेत़ विशेष म्हणजे गंगाखेड येथील खरेदी केंद्र सर्वात उशिराने १५ फेब्रुवारी रोजी सुरू झाले असून, अवघ्या सात दिवसांमध्ये या केंद्रावर ५० शेतकºयांची ६१७ क्विंटल तूर खरेदी झाली आहे़ तर परभणी येथील खरेदी केंद्रावर १९ शेतकºयांची २७१ क्विंटल, जिंतूरच्या खरेदी केंद्रावर ७१ शेतकºयांची ५१६ क्विंटल, सेलू केंद्रावर ३७ शेतकºयांची ४२५ क्विंटल, पूर्णा येथील खरेदी केंद्रावर ५१ शेतकºयांची ६२१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़
लाल रंगाच्या दोरीसाठी धावपळ
तूर खरेदी करताना ती कोणत्या विभागातून खरेदी झाली आहे़ हे लक्षात यावे, यासाठी यंदा शासनाने प्रत्येक विभागात तुरीचे पोते शिवण्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या दोºया वापरण्याचे निर्देश दिले आहेत़ मराठवाडा विभागासाठी लाल रंगाच्या दोरीने पोते टाचायचे आहे़ त्यामुळे लाल रंगाची दोरी शोधण्यासाठी कर्मचाºयांना धावपळ करावी लागली़ परभणीच्या बाजारपेठेत लाल रंगांच्या दोºया उपलब्ध असल्या तरी तालुक्याच्या ठिकाणी या दोºया मिळतील की नाही, अशी शंका आहे़ त्यामुळे मिळेल त्या दोरीला लाल रंगाने रंगवून पोते शिवले जात आहेत़
आज सुरू होणार बोरीचे केंद्र
बोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे़ या बाजार समितीत परिसरातील अनेक शेतकºयांनी नोंदणी केली आहे़ विशेष म्हणजे खरेदी केंद्रासाठी या ठिकाणी आंदोलनही झाले होते़ या सर्व पार्श्वभूमीवर बोरी येथे केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून, २२ फेब्रुवारीपासून प्रत्यक्षात या केंद्राला सुरुवात होईल, अशी माहिती मार्केटींग फेडरेशनच्या वतीने देण्यात आली़