परभणी : महावितरण कंपनीने ‘बँडबाजा’ मोहीम गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:51 PM2019-09-25T23:51:12+5:302019-09-25T23:51:41+5:30
मोठ्या थकबाकीदार ग्राहकांकडील वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवून वसुली करण्याची महावितरणने सुरू केलेली मोहीम पहिल्याच दिवशी गुंडाळावी लागली आहे. या मोहिमेसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्याने आता बॅण्डबाजा न वाजविता केवळ वसुली मोहीमच राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मोठ्या थकबाकीदार ग्राहकांकडील वसुलीसाठी त्यांच्या घरासमोर बॅण्डबाजा वाजवून वसुली करण्याची महावितरणने सुरू केलेली मोहीम पहिल्याच दिवशी गुंडाळावी लागली आहे. या मोहिमेसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना आल्याने आता बॅण्डबाजा न वाजविता केवळ वसुली मोहीमच राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
महावितरणच्या परभणी मंडळ कार्यालयांतर्गत वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर सातत्याने वाढत आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
सदरील थकबाकी वसूल करण्यासाठी वीज ग्राहकांच्या घरासमोर २५ सप्टेंबरपासून बॅण्ड वाजवत वीज बिल भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले होते. यामध्ये परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत ५८८ वीज ग्राहकांकडे ११ कोटींची थकबाकी आहे. तसेच परभणी शहरातील २५९ वीज ग्राहकांकडे ८ कोटी ५ लाख, पाथरी उपविभागांतर्गत ६५ ग्राहकांकडे १ कोटी ७३ लाख, पूर्णा उपविभागांतर्गत ७४ ग्राहकांकडे १ कोटी ४१ लाख, गंगाखेड उपविभागातील ६३ ग्राहकांकडे १ कोटी ९५ लाख, जिंतूर उपविभागांतर्गत १९८ वीज ग्राहकांकडे ४ कोटी २९ लाख, मानवत उपविभागातील ३८ वीज ग्राहकांकडे १ कोटी २६ लाख, सेलू उपविभागातील ७८ ग्राहकांकडे १ कोटी ९२ लाख तर सोनपेठ उपविभागातील ४५ ग्राहकांकडे ८९ लाख रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीच्या गर्देत सापडलेल्या महावितरणने बुधवारपासून सुरु होणाऱ्या या विशेष वसुली मोहिमेत महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, जनमित्र सहभागी होणार होेते. त्याच बरोबर पोलीस यंत्रणाही या मोहिमेत सोबत राहणार होती.
वीज ग्राहकांच्या घरासमोर बॅन्डबाजा वाजवत वीज बिल वसूल करण्यासाठी महावितरण प्रशासन सज्ज झाले होते; परंतु, वीज ग्राहकांच्या घरासमोर बॅण्ड वाजवून वसुली करणे असे कोणत्याही शासकीय परिपत्रकात किंवा शासन निर्णयामध्ये नाही. त्यामुळे ग्राहकांच्या अधिकारांचे हनन होऊ नये म्हणून महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बॅण्डबाजा वाजविण्याची मोहीम तात्काळ रद्द करून केवळ घरोघरी जाऊन वीज बिलाची वसुली करा, असे आदेश अधीक्षक अभियंता कार्यालयाला दिले आहेत. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांच्या दारात बॅण्ड वाजविण्यास सज्ज असलेल्या महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी व वसुली पथकाची मात्र चांगलीच गोची झाली आहे. बॅण्डबाजा मोहीम रद्द करीत ग्राहकांच्या घरी जाऊन महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज बिलाची वसुली करीत असल्याचे २५ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात दिसून आले.
जिल्ह्यात अशी झाली वीजबिल वसुली
४एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले जिल्ह्यामध्ये घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १४३९ वीज ग्राहक आहेत. त्यांच्याकडे ३३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणच्या वतीने १८ सप्टेंबरपासून मोहीम राबविण्यात येत आहे.
४यामध्ये परभणी ग्रामीण उपविभागांतर्गत एका वीज ग्राहकाकडून २ लाख ९७ हजार, परभणी शहर उपविभागांतर्गत २२ ग्राहकांकडून ३५ लाख ७३ हजार, पाथरी उपविभागांतर्गत २ ग्राहकांकडून ३ लाख ३१ हजार, पूर्णा उपविभागांतर्गत ४ ग्राहकांकडून ३ लाख ७२ हजार, गंगाखेड उपविभागांतर्गत ८ ग्राहकांकडून ८ लाख ९३ हजार, जिंतूर उपविभागांतर्गत ५ ग्राहकांकडून १४ लाख ६२ हजार, मानवत उपविभागांतर्गत ३ ग्राहकांकडून ६ लाख १४ हजार, पालम उपविभागांतर्गत ३ ग्राहकांकडून १ लाख ९८ हजार, सेलू उपविभागांतर्गत ७ ग्राहकांकडून १२ लाख ४ हजार तर सोनपेठ उपविभागांतर्गत एका ग्राहकाकडून ५० हजारांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. त्यामुळे महावितरणने १९ ते २४ सप्टेंबर या कालावधीत ५६ ग्राहकांकडून ९२ लाख ९४ हजार रुपयांची वसुली केली आहे.