परभणी : पाण्यासाठी मनपावर धडकला मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:56 AM2019-01-29T00:56:53+5:302019-01-29T00:57:20+5:30
शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील खानापूर नगर भागात निर्माण झालेल्या पाणीटंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ढोल-ताशाच्या गजरात आणि जोरदार घोषणाबाजी करीत निघालेल्या या मोर्चाने शहरवासियांचे लक्ष वेधले.
खानापूर नगर हा शहरापासून दूर अंतरावर असलेला भाग असून या भागात मागील काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेने या परिसरासाठी जलवाहिनी टाकली असली तरी अद्याप या जलवाहिनीला मुख्य जलवाहिनीशी जोडले नसल्याने नळांना पाणी येत नाही. हातपंपांची पाणीपातळी खालावल्यामुळे टंचाईत भर पडली आहे. दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी २८ जानेवारी रोजी सकाळी खानापूरनगर येथून मोर्चाला सुरुवात केली. ढोल-ताशाच्या गजरात निघालेला हा मोर्चा वसमत रस्त्यावरुन महापालिकेवर पोहचला. या ठिकाणी नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, यासह इतर घोषणांनी परिसर दणाणून गेला. या मोर्चात परिसरातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खानापूरवासियांचा प्रश्न
४खानापूर नगर भागात जलवाहिनी नसल्याने येथील नागरिकांना हातपंपाच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत आहे. जलवाहिनीचे काम अर्धवट असून हातपंपही आटल्याने पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी थेट मनपा कार्यालयावर मोर्चा काढला.