परभणीची बाजारपेठ :संक्रांतीच्या खरेदीला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 11:53 PM2018-01-13T23:53:45+5:302018-01-13T23:54:06+5:30
नवीन वर्षातील पहिल्याच मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत शनिवारी तोबा गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़ भाज्यांपासून ते विविध वस्तुंपर्यंत सर्वच दुकानांवर खरेदीसाठी गर्दी झाली होती़ यामुळे यावर्षीच्या पहिल्याच सणाला बाजारपेठेतील उलाढालीत मोठी वाढ झाली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नवीन वर्षातील पहिल्याच मकरसंक्रांती सणाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत शनिवारी तोबा गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले़ भाज्यांपासून ते विविध वस्तुंपर्यंत सर्वच दुकानांवर खरेदीसाठी गर्दी झाली होती़ यामुळे यावर्षीच्या पहिल्याच सणाला बाजारपेठेतील उलाढालीत मोठी वाढ झाली आहे़
१४ जानेवारी रोजी जिल्हाभरात मकरसंक्रांतीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे़ मकरसंक्रांत हा महिलांचा सण असल्याने बाजारपेठेमध्ये विविध वस्तू खरेदी करण्यासाठी आठ दिवसांपासून गर्दी होत आहे़ संक्रांतीच्या पूर्वसंध्येला या गर्दीत मोठी वाढ झाल्याचे पहावयास मिळाले़ सकाळपासूनच बाजारपेठ फुललेली होती़ शनिवारी सर्वत्र भोगीचा सण साजरा करण्यात आला़
या सणासाठी रानमेव्याची पूजा केली जाते़ यानिमित्ताने बोर, ऊस, जांब, हरभरा, वाल्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीला आल्या होत्या़ विविध भाज्यांच्या खरेदीबरोबरच पूजेच्या साहित्याची खरेदीही यानिमित्ताने झाली़
शहरातील गांधी पार्क, गुजरी बाजार परिसरात संक्रांतीसाठी लागणाºया वाणाच्या वस्तुंची दुकाने सजली होती़ त्याचप्रमाणे हळद, कुंकू, विविध रंगांची रांगोळी, गुलाल असे पुजेचे साहित्यही विक्रीसाठी उपलब्ध होते़ संक्रांतीला सुगड्यांचे महत्त्व असल्याने जागोजागी सुगडे विकणाºयांनीही आपली दुकाने थाटली होती़
यावर्षी प्रथम गांधी पार्काबरोबरच देशमुख हॉटेल, काळी कमान भागातही विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती़ गांधी पार्क व परिसरामध्ये दुकाने थाटण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी विक्रेत्यांनी पर्यायी जागा निवडली़ तेथेही खरेदीसाठी गर्दी झाली होती़
संक्रांतीची लगबग
रविवारी मकर संक्रांतीचा मुख्य सण साजरा केला जात आहे़ यादिवशी सुवासिनी वाणांचा आवा लुटतात़ यानिमित्ताने सायंकाळच्या सुमारास ठिक ठिकाणी हळदी कुंकवाचे कार्यक्रम घेतले जातात़ मागील काही वर्षांपासून पर्यावरण पूरक संक्रांती साजरी करण्याची प्रथाही रूढ झाली असून, रोपट्यांचा आवा दिला जात आहे़ यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात येतो़
तीळ-गुळाचे भाव स्थिर
मकर संक्रांतीच्यानिमित्ताने एकमेकांना तीळ-गुळ देण्याची प्रथा आहे़ यासाठी बाजारपेठेत तीळ आणि गुळाची मोठी विक्री झाली़ मागील वर्षीच्या तुलनेत तीळ आणि गुळांचे भाव स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़ १०० रुपये किलो तीळ आणि ३५ रुपये किलो गुळ या दराने दिवसभर तीळ आणि गुळाची विक्री झाली़ त्याच प्रमाणे साखरेपासून बनविलेला हलव्यालाही मागणी वाढली होती़