परभणी : कृषी विद्यापीठाचे एमएयुएस ७१ सोयाबीन वाण नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 12:45 AM2020-01-06T00:45:08+5:302020-01-06T00:45:49+5:30
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन एमएयुएस ७१ हे बियाणे पैदासकर व पायाभूत बियाणे म्हणून नापास ठरले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेले सोयाबीन एमएयुएस ७१ हे बियाणे पैदासकर व पायाभूत बियाणे म्हणून नापास ठरले आहे.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने २०१८-१९ मध्ये सोयाबीन एमएयुएस ७१ या वाणाचा पैदासकार व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्रावर राबविण्यात आला. महाबीजने हे वाण शुद्ध नसल्याचा अहवाल वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील संचालक संशोधन विभागाला दिला आहे.
दरम्यान या अहवालानंतर ४ डिसेंबर रोजी संचालक संचालनालयात कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेनंतर कुलगुरू डॉ.ढवण यांनी संचालक संशोधन यांच्या नावाने पत्र काढले असून, त्यात म्हटले आहे की, सोयाबीन एमएयुएस ७१ या वानाचा पैदासकार व पायाभूत बियाणे उत्पादनाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या महाविद्यालय व संशोधन केंद्रावर राबविण्यात आला असून अनुवंशिक शुद्धते अभावी हा संपूर्ण बीजोत्पादन कार्यक्रम बाद ठरला आहे. विविध स्तरावर बियाणे उत्पादन कार्यक्रमात बियाणांची अनुवंशिक शुद्धता राखण्याकरिता योग्य ती खबरदारी घेतली गेली नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेला गालबोट लागण्याबरोबरच आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागले आहे. विद्यापीठाच्या वेगवेगळ्या पिकांचा जो बिजोत्पादन कार्यक्रम राबविला जाणार आहे, त्यानुषंगाने घेतलेल्या निर्णयाचे सर्व संबंधितांनी काटेकोर पालन करावे व भविष्यात असा हलगर्जीपणा दिसून आल्यास योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना डॉ.ढवण यांनी संचालक संशोधक यांना दिल्या आहेत.
भेसळयुक्त बिजपुरवठा; श्रीनिवास मुंडे यांची राज्यपालांकडे तक्रार
या प्रकरणात जिल्हा परिषदेचे कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी राज्यपालांना पत्र पाठविले असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने महाबीज मंडळ व शेतकऱ्यांना सोयाबीन ७१ चा भेसळयुक्त बीजपुरवठा केल्याची तक्रार केली आहे. राज्यातील चारही विद्यापीठातर्फे शेतकऱ्यांना पायाभूत बियाणांचा पुरवठा करणे अपेक्षित आहे.
अनुवंशिकदृष्ट्या शुद्ध बियाणे कृषी विद्यापीठाने पुरविल्यास शेतकºयांना जास्त उत्पादन मिळविता येईल. मात्र वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शुद्ध बियाणांमध्ये भेसळ करीत शुद्ध बियाणे म्हणून पुरवठा करून शेतकºयांची फसवणूक केली आहे. ही बाब महाराष्ट्र राज्य सिड्स कार्पोरेशन लि. मार्फत कृषी विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
ही बाब गंभीर असून, भेसळयुक्त बियाणे दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा तसेच विद्यापीठाचे कुलगुरू आणि संचालक संशोधन यांना बडतर्फ करावे, अशी मागणी कृषी सभापती श्रीनिवास मुंडे यांनी कुलपती तथा राज्यपालांकडे केली आहे.