परभणी ; एमआयडीसी उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:03 AM2019-01-01T01:03:47+5:302019-01-01T01:04:03+5:30

तालुक्यातील हादगाव पावडे शिवारात प्रस्तावित एम.आय.डी.सी. उभारणीसाठी संपादित करावयाच्या जमिनीचे दर निश्चित होत नसल्याने एम.आय.डी.सी. उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे.

Parbhani; MIDC construction process in cold storage | परभणी ; एमआयडीसी उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात

परभणी ; एमआयडीसी उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : तालुक्यातील हादगाव पावडे शिवारात प्रस्तावित एम.आय.डी.सी. उभारणीसाठी संपादित करावयाच्या जमिनीचे दर निश्चित होत नसल्याने एम.आय.डी.सी. उभारणीची प्रक्रिया थंड बस्त्यात पडली आहे.
सेलू शहरासाठी स्वतंत्र एमआयडीसी निर्माण करावी, अशी मागणी स्थानिक नागरी समिती व उद्योजकांनी मागील अनेक वर्षांपासून लावून धरली होती. या मागणीची दखल घेत, हादगाव पावडे शिवारातील २४५.८१ हेक्टर जमीन एम.आय.डी.सी.साठी प्रस्तावित करण्यात आली. त्यानंतर हादगाव खु., पिंप्रोळा, रवळगाव या शिवारातील प्रस्तावित जमिनीची भूमिअभिलेख कार्यालयाकडून एक वर्षापूर्वी मोजणीही पूर्ण करण्यात आली; परंतु, शेत जमिनीवरील झाडे, विहिरी, पाईपलाईनच्या नोंदीवरून भूमिअभिलेख कार्यालय व महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळ या दोन कार्यालयांमध्ये समन्वय होत नसल्याने जमीन मोजणी अहवाल अनेक महिने अडकून पडला होता. अखेर जमीन मोजणीचा संयुक्त अहवाल संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आला. मात्र शेत जमिनीच्या दराचा घोळ अद्यापही कायम आहे. त्यामुळे एमआयडीसी उभारण्याच्या हालचालीला गती मिळालेली नाही.
प्राप्त माहितीनुसार सेलू येथील महसूल विभागाने प्रस्तावित शेत जमिनीच्या बाजार भावाबाबत अहवाल तयार करून नगररचना कार्र्यालयाला पाठविला आहे. प्रस्तावित जमिनीच्या दराबाबत बैठकाही घेण्यात आल्या. मात्र नगर रचनाकार कार्यालयाकडून दर निश्चिती अहवाल संबंधित विभागाकडे अद्यापही पोहोचला नसल्याची माहिती आहे. शेत जमीन मालक, एमआयडीसी, महसूल विभाग यांच्यात दर निश्चितीबाबत समन्वय घडवून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महसूल विभाग, एमआयडीसी कार्यालय यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे; परंतु, ही सर्व प्रक्रिया अत्यंत संथ गतीने होत असल्याने एमआयडीसी उभारणीस विलंब होत आहे.
दरम्यान, सेलू तालुक्यात सद्यस्थितीत उद्योगांसाठी जागाच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बेरोजगारांना काम मिळत नाही. हादगाव खु. शिवारातील एमआयडीसीसाठी प्रस्तावित शेत जमीन उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल मानली जाते. कारण हादगाव लगतच निम्न दुधना प्रकल्प आहे. तसेच याच शिवारात प्रस्तावित वीज केंद्र असल्याने उद्योगासाठी आवश्यक असणारे पाणी आणि वीज या परिसरात सहज उपलब्ध होणे शक्य आहे. तसेच सेलू शहर रेल्वे मार्गावर असल्याने देशभरातील व्यापाऱ्यांना संपर्काच्या दृष्टीने सेलू शहर हे सोयीचे पडते. त्यामुळे एमआयडीसी झाल्यास उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे.
शेतकºयांनी घेतली लोणीकर यांची भेट
४सेलू तालुक्यातील हादगाव येथे एमआयडीसी उभारणीसाठी तातडीने शासनाकडून कार्यवाही करावी, या मागणीसाठी रवळगाव येथील शेतकºयांनी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची जालना येथे तीन दिवसांपूर्वीच भेट घेतली.
४एमआयडीसी उभारणीच्या कामाला गती देण्याची मागणी शिष्टमंडळाने लोणीकर यांच्याकडे केली. यावेळी भाजपा सरचिटणीस पंकज निकम, उदय रोडगे, सुरेंद्र रोडगे, विकास गादेवार, महादेवराव रोडगे, दत्तात्रय रोडगे, विष्णूपंत रोडगे यांची उपस्थिती होती. या प्रश्नी मार्ग काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला देऊ, असे आश्वासन लोणीकर यांनी यावेळी दिले.

Web Title: Parbhani; MIDC construction process in cold storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.