परभणी : ४३ लाखांचा खनिज विकास निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 12:36 AM2019-01-17T00:36:34+5:302019-01-17T00:37:29+5:30

जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्राप्त झाले असून या निधीतून तालुक्यातील नऊ गावांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत.

Parbhani: Mineral Development Fund sanctioned for 43 lakhs | परभणी : ४३ लाखांचा खनिज विकास निधी मंजूर

परभणी : ४३ लाखांचा खनिज विकास निधी मंजूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : जिल्हा खनीजकर्म विभागांतर्गत जमा असलेल्या खनीज विकास निधीतून तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींना गावात विविध विकासकामे करण्यासाठी ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ५० टक्के निधी म्हणजेच २१ लाख ६३ हजार १८४ रुपये मानवत पंचायत समितीला प्राप्त झाले असून या निधीतून तालुक्यातील नऊ गावांमध्ये विविध विकासकामे केली जाणार आहेत.
तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या क्षेत्रावर गौण खनिजाचे उत्खनन केल्याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने एकूण उत्पादनाच्या काही भाग संबंधित ग्रामपंचायतीमार्फत गावाच्या विकासासाठी देण्यासाठी पुढाकार घेतला.
तालुक्यातील रामपुरी, वांगी, उक्कलगाव, कोल्हा, इरळद, कोल्हावाडी, हटकरवाडी, खरबा, रुढी या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गौण खनिजाचे उत्खनन करण्यात आले होते. या बदल्यात लाखोंचा महसूल जमा झाला होता. यापैकी काही रक्कम ग्रामपंचायतीला मिळणार असल्याने ग्रामपंचायतींनी गावातील महत्त्वाची व अति महत्त्वाच्या कामाची यादी करून या कामाचे ठराव घेऊन जिल्हा परिषदेला पाठविण्यात आले. जि.प. ने हे ठराव आणि कामाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविली. छाननी करून ९ ग्रामपंचायतींना विकासकामासाठी एकूण ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी ५० टक्के निधी पंचायत समितीला प्राप्त झाला आहे.
उर्वरित ५० टक्के निधी काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. यामध्ये कोल्हावाडी गावासाठी ११ लाख रुपये, हटकरवाडी ७१ हजार ५५९ रुपये, खरबा ३८ हजार ८५९ रुपये, ३ लाख ४५ हजार ७१५, रामपुरी ७३ हजार ३७६, वांगी ४ लाख ५२ हजार ९२२ रुपये, उक्कलगाव ६४ हजार ७६५, कोल्हा १९ हजार ३९८ , इरळद ६ हजार ७६३ असा एकूण २१ लाख ६३ हजार १८४ रुपयांचा ५० टक्के निधी पंचायत समितीकडे वर्ग करण्यात आला आहे.
निधीचा हिशोब ठेवावा लागणार
गौण खनिज खनिकर्म विभागाकडून मिळालेल्या निधीतून विकासकामे करताना ग्रामपंचायतींना वितरित केलेला निधी त्याच कामावर खर्च करावा लागणार आहे. मंजूर निधीपेक्षा जास्तीचा खर्च करता येणार नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. विकासकामांचा मासिक प्रगतीचा अहवाल न चुकता ग्रामपंचायतींना सादर करावा लागणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कामाच्या ठिकाणी दर्शनी भागात कामाचा फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. नियमानुसार काम झाले असल्याची खात्री झाल्यानंतरच उर्वरित निधी वितरित केला जावा, असा आदेश जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी दिला आहे. त्यामुळे मिळालेल्या निधीतून झालेल्या विकासकामांचा चोख हिशोब ठेवावा लागणार आहे.
कोल्हावाडी ग्रा.पं.ला : सर्वाधिक निधी
गौण खनिजाचे उत्खनन केल्याबद्दल मानवत तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींना ४३ लाख २६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये हटकरवाडी ग्रामपंचायतीला १ लाख ४३ हजार रुपये, खरबा ७७ हजार रुपये, रुढी ३ लाख ९ हजार रुपये, रामपुरी १ लाख ६४ हजार रुपये, वांगी ९ लाख २१ हजार रुपये, इरळद १३ हजार ५०० रुपये, उक्कलगाव १ लाख २९ हजार तर सर्वाधिक कोल्हावाडी ग्रामपंचायतीला २१ लाख ६४ हजार रुपयांचा निधी गौण खनिज खनिकर्म विभागांतर्गत मंजूर करण्यात आला आहे. मात्र यातील ५० टक्के निधी पं.स.ला वर्ग झाला आहे. उर्वरित निधी काम पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे. या निधीतून पाणीपुरवठा, वृक्ष लागवड, अंगणवाडी, शालेय साहित्य खरेदी, पर्यावरण संवर्धन, कौशल्य विकास, सिमेंट रस्ते, पथदिवे बसविणे, पाणलोट इ. कामे केली जाणार आहेत.

ग्रामपंचायतींनी अंदाजपत्रक तयार करून पंचायत समितीला सादर केल्यानंतर कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहेत.
-शैलेंद्र पानपाटील,
विस्तार अधिकारी, पं.स. मानवत

Web Title: Parbhani: Mineral Development Fund sanctioned for 43 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.