परभणी : बचतगटातील सदस्यांसाठी मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:03 AM2019-07-25T00:03:50+5:302019-07-25T00:04:38+5:30
शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचतगटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वितरित केली जाणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी :शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचतगटांना ९ ते १८ अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वितरित केली जाणार आहेत.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत बचतगट असावा. नोंदणीकृत बचतगटामध्ये किमान १० सदस्य असावेत. त्यापैकी ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत. बचतगटाचे अध्यक्ष, सचिव अनुसूचित जातीचेच असावेत. सदस्यांचे जातीचे व रहिवासी प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्याने प्राधिकृत केलेले असावेत. स्वयंसहाय्य बचतगटाने राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे व हे खाते गटाचे अध्यक्ष, सचिव यांच्या आधारकार्डशी संलग्न असावे. गटातील सदस्यांनी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. अशा अटी या योजनेसाठी निश्चित केली आहे. अर्जदारांची संख्या उदिष्टापेक्षा अधिक असल्यास पात्र अर्जदारांची निवड ड्रॉ पद्धतीने केली जाणार आहे. बचतगटातील एका सदस्यास वाहन चालविण्याचा सक्षम परवाना असावा. लाभार्थी स्वयंसहाय्यता बचतगटांना या योजनेत ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जास्त अश्वशक्तीचे ट्रॅक्टर खरेदी करता येतील. मात्र योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम ३.१५ लाख पेक्षा जास्त असेल तर बचतगटाने स्वत: खर्च करावा लागेल. तेव्हा या सर्व नियम अटींचे पालन करुन प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाजकल्याण परभणी या कार्यालयात ३१ जुलैपूर्वी सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.