परभणी : रस्त्यावर सापडलेले पैशांचे पाकीट युवकांनी केले परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:56 PM2019-05-26T23:56:26+5:302019-05-26T23:56:56+5:30
जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हरिभाऊ डुकरे व संतोष नितनवरे या दोन तरुणांनी कौसडी फाटा येथे सापडलेले पैशांचे पॉकेट संबंधित व्यक्तीस परत केले आहे. बोरी पोलीस व ग्रामस्थांनी या दोन्ही तरुणांचे कौतुक केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोरी (परभणी): जिंतूर तालुक्यातील बोरी येथील हरिभाऊ डुकरे व संतोष नितनवरे या दोन तरुणांनी कौसडी फाटा येथे सापडलेले पैशांचे पॉकेट संबंधित व्यक्तीस परत केले आहे. बोरी पोलीस व ग्रामस्थांनी या दोन्ही तरुणांचे कौतुक केले आहे.
बोरीपासूनच जवळच असलेल्या रेपा या गावातील डिगांबर दत्तराव राजे हे बोरी येथे आठवडी बाजारात कामानिमित्त आले होते. आपले काम आटोपून ते बोरी येथील फाट्यावर कौसडीकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत होते. त्याचवेळी त्यांच्या खिशातील पॉकेट खाली पडले असावे. या पॉकेटमध्ये २ हजार रुपये व महत्त्वाची कागदपत्रे होती.
बोरी येथील हरिभाऊ डुकरे व संतोष नितनवरे या हे दोघे बोरी फाट्यावरुन जात असताना त्यांना हे पॉकेट सापडले. पॉकीटातील महत्त्वाची कागदपत्रे पाहिल्यानंतर संबंधिताला त्याचे पॉकेट मिळाले पाहिजे, या हेतूने या दोन्ही तरुणांनी बोरी पोलीस ठाणे गाठले.
बोरी पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील गिरी, बीट जमादार विष्णू गिरी, हवालदार कांदे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पॉकेटमध्ये असलेल्या कागदपत्रांवरील पत्त्यावरुन पोलीस प्रशासनाने रेपा येथील डिगांबर राजे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत कागदपत्रे व रोख रक्कमेसह त्यांचे पॉकेट परत करण्यात आले. तरुणांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे बोरी पोलीस व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.