परभणीत आंदोलन चिघळले : दगडफेक अन् सौम्य लाठीमाराने पळापळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:45 AM2018-07-27T00:45:35+5:302018-07-27T00:45:48+5:30
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे़ या अंतर्गत गुुरुवारी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या़ त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे़ या अंतर्गत गुुरुवारी शहरात दगडफेकीच्या घटना घडल्या़ त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली़
परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात गुरुवारी सकाळी १० वाजता ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते़ परभणी बंदचे आवाहन करण्यात आले नव्हते; परंतु, सकाळपासून शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती़ काही शाळांना सुट्याही देण्यात आल्या होत्या़ शहरातील डॉक्टरलेन भागात दुकाने बंद करण्यावरून दुपारी १२ च्या सुमारास दगडफेक झाली़ दरम्यानच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात अनेक कार्यकर्ते जमले होते़ येथे काही पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू असताना घोषणाबाजी सुरू झाली़ त्यानंतर काही जणांनी वसमत रस्त्यावर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर रास्ता रोको सुरू केला़ तर काही जणांनी विसावा कॉर्नर भागात दगडफेक केली़ त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही दगडफेकीला सुरुवात झाली़ यावेळी या भागातील अॅड़अशोक सोनी यांच्या घरावर तसेच भावना हॉस्पीटल, इंडियन ओव्हरसिस बँकेवर दगडफेक झाली़ त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते महात्मा फुले यांचा नियोजित पुतळा या रस्त्यावरही जमावाने दुकानांवर दगडफेक केली़ येथे पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली़ बराच वेळ पोलीस आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते; परंतु, आंदोलक परत जात नव्हते़ पोलिसांनी नंतर कडक भूमिका घेत सौम्य लाठीमार केल्यानंतर जमाव पांगला़ शिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील कार्यकर्त्यांनाही निघून जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले़ त्यानंतर कार्यकर्ते निघून गेले. बसस्थानकासमोरील बाजुला असलेल्या रेल्वे पटरीवर मोठ्या संख्येने आंदोलक जमा झाले़ या ठिकाणाहून बसस्थानकासमोरून रस्त्यावरून धावणाºया वाहनांवर मोठी दगडफेक झाली़ यात पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ या घटनेनंतर बसस्थानक रस्त्यावर दगडांचा खच पडल्याचे दिसून आले़ शहरातील दर्गा रोड परिसरातही दगडफेक झाली़ त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले़
शहातील खानापूर फाटा, काळी कमान, शिवशक्ती बसस्टॉप, जिंतूर रोड आदी भागातील रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. दगडफेकीच्या घटनांमुळे शहरातील वसमत रस्ता, जिंतूर रोड, गंगाखेड रोड, पाथरी रोड आदी भागातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती़
दुपारी २ वाजेनंतर शहरातील परिस्थिती आटोक्यात आली़ तरीही सायंकाळी उशिरापर्यंत शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यात आली नव्हती. सायंकाळी शहरातील रस्त्यांवरही फारसी गर्दी दिसून आली नाही. असे असले तरी चौका-चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तिसºया दिवशीही एसटी बसेस बंदच
परभणी जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस आगाराबाहेर निघालेल्या नाहीत़ दररोज जिल्ह्यातील आगारामधून बसेसच्या १५०० फेºया होतात़ गुरुवारीही जिल्ह्यातील चारही आगारातून एकही बस बाहेर पडली नाही़ या संधीचा फायदा घेऊन खाजगी वाहतूकदारांनी प्रवाशांकडून दुप्पट प्रवास भाडे वसूल केले़ शिवाय खाजगी वाहनांचीही कमतरता असल्याने प्रवाशांना इच्छित स्थळ गाठताना मोठी कसरत करावी लागली़
पोलिसांचा आकसातून लाठीमार
परभणी : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात लोकशाही मार्गाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना पोलिसांनी आकसातून येथील टेंट फेकून दिला व कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आला़
शहरातील सावली शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणाले की, परभणी पोलिसांनी गुरुवारी मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान, घेतलेली भूमिका जनरल डायर यांना लाजवेल अशी होती़ मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणारे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली व ठिय्या आंदोलनाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते़ मोटारसायकलवर कार्यकर्ते फेरी मारत असताना व शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना हे आंदोलन चिरडण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला़ आंदोलनस्थळावरील टेंट फेकून दिला़ त्यानंतर केलेल्या लाठीमारात ५० ते ६० कार्यकर्ते जखमी झाले़ गल्लीमध्ये जाऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांना मारहाण केली़ लाठीमार करण्यापूर्वी तालुका दंडाधिकाºयांची परवानगी घेतली होती का? हे पोलीस अधिकाºयांनी स्पष्ट करावे़ तसेच या लाठीमाराच्या घटनेचा निषेध करून या घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी, पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली़
शनिवारी जिल्हाभरात चक्काजाम आंदोलन
परभणीत पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करावी, कार्यकर्त्यांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांना निलंबित करावे, यासह अन्य मागण्यांसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने २८ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक रस्त्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले़ चक्काजाम आंदोलना दरम्यान या आंदोलनास गालबोट लागणार नाही, याची काळजी घेतली जार्ईल़ आंदोलनातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सांगण्यात आले़