परभणी : भोगाव देवी पर्यटन स्थळासाठी चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:11 AM2019-07-06T00:11:24+5:302019-07-06T00:12:09+5:30
: जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील संस्थानच्या विस्तीर्ण अशा ७० एकर परिसरावर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी चळवळ उभा ठाकली असून ७ जुलैपासून या चळवळीला प्रत्यक्षात प्रारंभ होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरातील संस्थानच्या विस्तीर्ण अशा ७० एकर परिसरावर पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी चळवळ उभा ठाकली असून ७ जुलैपासून या चळवळीला प्रत्यक्षात प्रारंभ होत आहे.
राज्यात निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होत असलेली घट दूर करण्याच्या उद्देशाने जिंंतूर येथील अण्णासाहेब जगताप यांनी ‘एक मूल ३० झाडे’ हे अभियान सुरू केले आहे. याच अभियानाची कास पकडत जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी परिसरात पर्यटनस्थळ विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली. भोगाव येथील रवी देशमुख यांच्या समवेत अभियानातील १०० सक्रीय सदस्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला.
भोगाव देवी परिसरात मोठा तलाव असून संस्थानची सुमारे ७० एकर जमीन आहे. या जमिनीवर फळझाडे लावली जाणार आहेत. त्यासाठी दोन दिवसांपासून अभियानातील सदस्य, ग्रामस्थ सरसावले आहेत. झाडे लावण्यासाठी खड्डे खोदण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तलाव परिसर, संस्थानच्या संपूर्ण जमिनीवर सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक फळझाडे लावली जाणार आहेत. ही फळझाडे लावताना दीर्घ कालीन टिकणारी अंबा, चिंच, बिबा, जांभूळ, कवट या फळ झाडांची निवड केली जाणार आहे.
७ जुलै रोजी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी. पृथ्वीराज यांच्या हस्ते होणार आहे. देवी साहेब संस्थानचे अध्यक्ष गुलाबचंद राठी, साहित्यिक प्रा.डॉ. विनायक पवार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, विभागीय वन अधिकारी व्ही.एन. सातपुते, अॅड. किरण दैठणकर, प्रा. विठ्ठल भूसारे, अक्षय येवारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेश दरगड, आडत असोसिएशनचे अध्यक्ष सचिन देवकर, अभियानाचे नाशिक येथील विभागप्रमुख प्रा. ज्ञानेश्वर ढगे, आकाश कदम आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे. तत्पूर्वी भोगाव परिसरातून वृक्ष दिंडीही काढली जाणार असून यात भोगावसह परिसरातील गावांमधील शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमामुळे वृक्ष लागवड मोहिमेला चालना मिळणार आहे.
पाच जिल्ह्यात राबविले जाते अभियान
च्एक मूल ३० झाडं हे अभियान राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये राबविले जात आहे. त्यात परभणीसह हिंगोली, नांदेड, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्यांचा समावेश आहे.
च्नैसर्गिक, आर्थिक दुष्काळ दूर करण्याच्या उद्देशाने ५० ते १०० वर्षापर्यंत टिकणारी फळझाडे लावणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. एका मुलाच्या नावाने ३० झाडे लावणे, त्या झाडांचे संगोपन करणे, शेतातील मोकळी जागा, गावातील सार्वजनिक ठिकाणे, ओसाड, गायरान जमीन या अभियानासाठी निवडली जाते. भोगाव संस्थानने यासाठी पुढाकार घेतला आहे.
लोकसहभागातून कामे
४हे अभियान राबविताना ते पूर्णत: लोकसहभागातून आणि श्रमदानातून राबविले जाते. जिंतूर तालुक्यासह राज्य भरातून अनेकांनी या अभियानात सहभाग नोंदविला आहे.
४भोगाव येथे पर्यटनस्थळ विकासाची चळवळही याच अभियानातून हाती घेण्यात आली आहे. केवळ फळ झाडे लावणे हा एकमेव उद्देश नसून येथील तलावात बोटींग तसेच पर्यटनाची कामेही केली जाणार आहेत, असे अभियानाच्या सदस्यांनी सांगितले.