परभणी : आरक्षणासाठी मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 12:44 AM2018-08-03T00:44:10+5:302018-08-03T00:44:42+5:30
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पाथरी, मानवत, जिंतूर येथे आठवडाभरापासून धरणे आंदोलन सुरु आहे. गुरुवारीही ही आंदोलने सुरुच ठेवण्यात आली. जिंतूरमध्ये आ.विजय भांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पाथरी, मानवत, जिंतूर येथे आठवडाभरापासून धरणे आंदोलन सुरु आहे. गुरुवारीही ही आंदोलने सुरुच ठेवण्यात आली. जिंतूरमध्ये आ.विजय भांबळे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या प्रमुख मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन केले जात आहे. पाथरी, सेलू, जिंतूर आणि मानवत या चार ठिकाणी आठवडाभरापासून धरणे आंदोलन केले जात असून गुरुवारी ग्रमाीण भागातूनही समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
मानवतमध्ये आंदोलन सुरुच
मानवत येथे राज्य शासन मराठा आरक्षणासाठी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याच्या कारणावरुन सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयासमोर २ आॅगस्ट रोजी राज्य शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी देऊन निषेध करण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
मानवत येथे गेल्या १२ दिवसांपासून तहसीलसमोर आंदोलन सुरु आहे. गुरुवारी सावळी, नागरजवळा, खडकवाडी, बोंदरवाडी गावातील ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते.
आरक्षण मिळेपर्यंत मुले शाळेत न पाठविण्याचा निर्णय
पाथरी- तालुक्यातील सारोळा बु. येथील मराठा समाज बांधवांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुलांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला असून २ आॅगस्ट रोजी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले नाही. या दिवशी ७२ टक्के विद्यार्थी शाळेत अनुपस्थित राहिले. सारोळा बु. येथे जिल्हा परिषदेची आठवीपर्यंत शाळा आहे. या शाळेत ११८ विद्यार्थी शिक्षण घेतात. आंदोलन सुरु होण्यापूर्वी ११६ विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. मात्र आंदोलन सुरु झाल्यानंतर पहिल्याच दिवशी ११८ पैकी केवळ ३३ विद्यार्थी शाळेत दाखल झाले.
टाकळगव्हाणलाही शाळा बंद
आरक्षण जाहीर होईपर्यंत मुले शाळेत पाठवायची नाहीत, असा निर्णय सारोळा बु. येथील पालकांनी घेतल्यानंतर या अनोख्या आंदोलनाचे लोण टाकळगव्हाण गावातही पोहचले आहे. गुरुवारी दुपारी १ वाजेनंतर जिल्हा परिषदेची शाळा बंद करण्यात आली. मराठा आंदोलना संदर्भात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. आंदोलने करुनही सरकार नमत नसल्याने पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिंतुरमध्ये आमदारांच्या घरासमोर ठिय्या
मराठा आरक्षणाची मागणी विधानसभेत मांडावी व समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, यासाठी गुरुवारी आ.विजय भांबळे यांच्या घरासमोर भजने सादर करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. ठिय्या आंदोलनानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शहरातील प्रमुख मार्गावरुन मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलनाच्या स्थळी नेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारवर दबाव आणून विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी करीत आ. विजय भांबळे यांच्या घरासमोर हे आंदोलन करण्यात आले. मात्र आ.भांबळे हे मुंबई येथे असल्याने त्यांचे वडील माजी राज्यमंत्री माणिकराव भांबळे यांनी आंदोलनकर्त्यांना शांत करुन आम्ही समाजाच्या पाठिशी आहोत, असे सांगितले. दरम्यान, तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांनीही आंदोलनात सहभाग घेऊन आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. या आंदोलनात विविध गावांमधील भजनी मंडळेही सहभागी झाले होते.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या -मोहन फड
परभणी- मराठा समाजाला आरक्षण देऊन यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आ.मोहन फड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आ.फड यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, यासाठी पाथरी मतदारसंघात मराठा समाज बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे, त्यांची मागणी रास्त आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने निर्णय घ्यावा. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाºया आंदोलकांवर दाखल झालेले कठोर गुन्हे मागे घ्यावेत, असेही या निवेदनात फड यांनी म्हटले आहे.