परभणीच्या खासदारांकडून जिंतूर रस्ता कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:33 PM2019-04-12T23:33:50+5:302019-04-12T23:34:27+5:30
परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव यांनी परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव यांनी परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना केला.
परभणी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत मुंडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उमेदवार राजेश विटेकर, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे, आ.रामराव वडकुते, खा. माजीद मेमन, सुरेश वरपूडकर, सुरेश देशमुख, सुरेश जाधव, तुकाराम रेंगे, जि.प. अध्यक्षा उज्ज्वला राठोड, भावना नखाते आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, परभणीचे खा.संजय जाधव हे जिल्ह्याच्या विकासात अडसर असून त्यांच्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणाºया कंत्राटदाराला त्यांनी ५ कोटी रुपयांची मागणी केली. त्यामुळेच या रस्त्याचे काम रखडले आहे, असा गंभीर आरोपही यावेळी त्यांनी केला. शिवसेना ही चिवसेना झाली असून या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना अफजलखानाची उपमा देतात आणि त्याच अफजलखानाचा फॉर्म भरण्यासाठी गुजरातला जातात. ही बाळासाहेबांची शिवसेना नसून चिवसेना झाली आहे, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी तोडपाणी करणारे नेते म्हणून माझ्यावर आरोप केला. खर तर तोडपाणी करणारे कोण आहेत, याचा शोध घेतला पाहिजे. यासाठी माझी तुम्ही चौकशी करा, तुमच्या ुचिक्की, टीएचआर, मोबाईल घोटाळ्याची चौकशी मी करतो, असेही ते म्हणाले. यावेळी आ.भांबळे, माजीमंत्री वरपूडकर, माजी आ. देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अॅड. विनोद राठोड यांनी केले.
पुरावे द्या, राजकारणातून संन्यास घेतो -बंडू जाधव
४आ.धनंजय मुंडे यांच्या आरोपासंदर्भात प्रतिक्रिया देताना शिवसेनेचे उमेदवार खा.संजय जाधव म्हणाले की, परभणी- जिंतूर रस्त्याचे काम करणारा कंत्राटदार तेलंगणातील तेलगू देसमचा राज्यसभा खासदार आहे. या कंत्राटदारावर तेलंगणात सीबीआयच्या धाडी पडल्या. त्यामुळे त्याने या रस्त्याचे काम बंद केले आहे. जिंतूर येथे एका बैठकीत व्यापाऱ्यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात आपल्याकडे तक्रार केल्यानंतर मीच या विभागाचे कार्यकारी अभियंता जाधव यांना फोनवर बोलून या रस्त्याचे काम बंद झाल्याबद्दल त्यांना धारेवर धरले होते. त्यावेळी सदरील कंत्राटदार अडचणीत असल्याने काम बंद असल्याचे जाधव यांनी सांगितले होते. मी किंवा माझा कोणताही कार्यकर्ता या कंत्राटदाराला भेटला नाही, या रस्त्यावरील कामाच्या ठिकाणी कधीही गेलो नाही, कोणाचाही चहा पिला नाही. एखाद्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत असताना किमान त्याबाबतची पडताळणी तरी करुन घ्या. मी कोणाला पैसे मागितल्याचे पुरावे असतील तर द्या, राजकारणातून संन्यास घेतो आणि तुम्ही पुरावे देऊ शकत नसाल तर तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या, असा पलटवारही खा. जाधव यांनी केला. माझ्यावर वाळू ठेकेदारांशी संबंध असल्याचे आरोप करतात; परंतु, तुमचेच उमेदवार वाळू ठेकेदार आहेत, हे संपूर्ण गोदाकाठच्या गावांना विचारुन घ्या. शिवाय जिंतूर तालुक्यातील रेपा येथील कामाच्या प्रकरणात बांधकाम विभागाच्या अधिकाºयांना कोण आणि कशासाठी मारहाण केली, याचाही शोध घ्या, असेही जाधव म्हणाले.