परभणीच्या खासदाराचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2019 11:22 PM2019-05-22T23:22:07+5:302019-05-22T23:22:32+5:30
परभणी लोकसभा मतदारसंघा खासदार कोण? याचा फैसला गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून लोकसभेचा हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. त्यामुळे या निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघा खासदार कोण? याचा फैसला गुरुवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत होणार असून लोकसभेचा हा निकाल जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरणार आहे. त्यामुळे या निकालाविषयी उत्सुकता वाढली आहे.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी १८ एप्रिल रोजी २ हजार १७४ केंद्रावर ६३.१० टक्के मतदान झाले होते. मतदारसंघातील १९ लाख ८३ हजार ९०२ मतदारांपैकी १२ लाख ५१ हजार ८२५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात १७ उमेदवार उतरले असून खरी लढत शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव, राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आलमगीर खान यांच्यात होणार आहे. वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरली आहे. त्यामुळे आघाडीच्या मतांकडे शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांचे लक्ष राहणार आहे. परभणी मतदारसंघावर ३० वर्षांपासून शिवसेनेचे वर्चस्व असून पहिल्यांदाच शिवसेनेच्या वर्चस्वाला राष्ट्रवादी काँग्रेसने तगडे आव्हान दिले आहे. शिवाय राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीच्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी संपूर्ण अनुभव प्रचारात पणाला लावून प्रचार यंत्रणा राबविली तर शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांनी राजकारणातील आपला ३० वर्षांचा अनुभव पणाला लावून एकाकी झुंज दिली. शिवसेनेला राजकीय पक्षाची मान्यता परभणीमुळे मिळाली असल्याने या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
कडेकोट बंदोबस्त; ४५० पोलीस तैनात
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणीसाठी ३३ पोलीस अधिकारी आणि साडेचारशे पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. बुधवारी या कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम घेण्यात आली.
गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून मतमोजणी सुरु होणार आहे. मतमोजणी काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली ५ पोलीस निरीक्षक, २८ सहायक पोलीस निरीक्षक, १९१ पोलीस कर्मचारी, ३२ महिला पोलीस कर्मचारी आणि शहर वाहतूक शाखेतील ९ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. तसेच आर.सी.पी.च्या दोन आणि एस.आर.पी.ची एक कंपनी नियुक्त केली आहे. तसेच शहरात शिवाजी चौक, अष्टभुजा चौक, ग्रँड कॉर्नर, साने चौक, आझाद कॉर्नर, शाही मशिद, किंग कॉर्नर, शिवशक्ती बिल्डींग आदी १९ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावले असून येथे ९५ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे. विजयी मिरवणुकीसाठी संभाव्य बंदोबस्त तयार ठेवला आहे. त्यात ४ पोलीस निरीक्षक, ८ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, १०० पोलीस कर्मचारी, ५ महिला कर्मचारी आणि साध्या वेशातील १६ कर्मचाºयांची नियुक्ती केली आहे.