परभणी महापालिका : आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी २४ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 12:39 AM2018-11-28T00:39:13+5:302018-11-28T00:40:17+5:30
महापालिकेने बांधकाम परवानगी देण्यासाठी पूर्वीची आॅफलाईन परवानगी बंद केली असून तीन महिन्यांमध्ये मनपाकडे आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी २४ अर्ज दाखल झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: महापालिकेने बांधकाम परवानगी देण्यासाठी पूर्वीची आॅफलाईन परवानगी बंद केली असून तीन महिन्यांमध्ये मनपाकडे आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी २४ अर्ज दाखल झाले आहेत.
परभणी शहरात बांधकाम करण्यासाठी महानगरपालिकेची रितसर परवानगी घ्यावी लागते. यापूर्वी आॅफलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर संबंधिताला बांधकामाची परवानगी दिली जात होती. मात्र या पद्धतीत बदल करण्यात आला असून आता बांधकाम कर्त्याला परवानगीसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी महाआयटी या एजन्सीचा एक कर्मचारीही महापालिकेने नियुक्त केला आहे. सर्व बांधकाम परवाने आॅनलाईन देण्यासाठी एक सॉफ्टवेअर विकसित केले असून त्याद्वारे बांधकाम परवाना दिला जात आहे. या प्रक्रियेमुळे बांधकाम परवानगी देण्याच्या कारवाईत पारदर्शकता आली आहे. आॅनलाईन बांधकाम परवाना देण्यासाठी मनपाने शहरातील स्थापत्य अभियंत्यांची नियुक्ती केली असून त्यांच्या मार्फतच आॅनलाईन बांधकाम परवान्याचा अर्ज स्वीकारला जातो.
१ आॅगस्ट २०१८ पासून परभणी शहरातील बांधकाम परवाने आॅनलाईन दिले जात आहेत. या परवान्यांसाठी महापालिकेकडे आतापर्यंत २४ अर्ज दाखल झाले असून त्यातील एका अर्जाला मनपाने रितसर आॅनलाईन परवानगी दिली आहे.
बांधकाम परवानगी देण्यासाठी सुरु केलेली आॅनलाईन प्रक्रिया सद्यस्थितीत किचकट वाटल असली तरी या प्रक्रियेत बदल होणार नसल्याने नागरिकांना आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करावे लागणार आहेत. त्यामुळे या प्रक्रियेविषयी नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे.
अशी आहे प्रक्रिया
४बांधकाम परवानगी देण्यासाठी आता आॅनलाईन अर्ज करावे लागणार असून शहरात बांधकाम करताना नियुक्त केलेल्या सल्लागार अभियंत्यामार्फत अर्ज केले जाणार आहेत. बांधकामकर्त्याचे आधारकार्ड, बांधकामाचा नकाशा आणि इतर कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नगररचनाकार संबंधित जागेची पाहणी करुन या अर्जाला मंजुरी देतील. लिपीकांमार्फत कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधिताला बांधकाम परवानगी दिली जाते. विशेष म्हणजे, जागेची पाहणी करण्यासाठी आॅनलाईन संदेशही पाठविला जातो. जास्तीतजास्त ६० दिवसांचा कालावधी परवाना देण्यासाठी दिला आहे.
पहिला आॅनलाईन परवाना मंजूर
४आॅनलाईन प्रक्रिया सुरु झाल्यानंतर पहिला अर्ज मंजूर केला आहे. ११ आॅक्टोबरपासून आॅनलाईन कामाला सुरुवात झाली आहे. अली हुसेन युसूफ अदमनकर यांना डिजीटल स्वाक्षरीच्या सहाय्याने पहिला आॅनलाईन परवाना दिला आहे. सर्व कागदपत्रांची पाहणी, जागेची पाहणी केल्यानंतरच हा परवाना देण्यात आला असून महापालिकेतील इतिहासातील अदमनकर यांच्या पहिला आॅनलाईन परवाना ठरला आहे.
आज बी.रघुनाथमध्ये कार्यशाळा
४आॅनलाईन बांधकाम परवाना देण्यासाठी अनेकांना माहितीचा अभाव असल्याने या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेची माहिती देण्यासाठी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता बी.रघुनाथ सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगररचनाकार किरण फुटाणे यांनी दिली.
४या कार्यशाळेत प्रशिक्षित अभियंते, महापालिकेचे अधिकारी आणि तज्ञ आॅनलाईन अर्जासंदर्भात माहिती देणार आहेत. नागरिकांनी कार्यशाळेला उपस्थित रहावे, असे आवाहन नगररचनाकार किरण फुटाणे, रईस खान, महाआयटीचे प्रसाद वडवळकर यांनी केले आहे.