परभणी महानगरपालिका : अन्सारी, पाचलिंग, गव्हाणे स्वीकृत सदस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:43 AM2017-12-05T00:43:02+5:302017-12-05T00:46:00+5:30
महानगरपालिकेतील चार स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर सोमवारच्या सर्वसाधारण सभेत अखेर पडदा पडला असून काँग्रेसचे लियाकत अली अन्सारी, बंडू पाचलिंग व भाजपाचे मधुकर गव्हाणे यांची या पदासाठी निवड झाल्याची घोषणा सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महानगरपालिकेतील चार स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर सोमवारच्या सर्वसाधारण सभेत अखेर पडदा पडला असून काँग्रेसचे लियाकत अली अन्सारी, बंडू पाचलिंग व भाजपाचे मधुकर गव्हाणे यांची या पदासाठी निवड झाल्याची घोषणा सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
महानगरपालिकेत काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या तीन स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरुन गेल्या सहा महिन्यांपासून अंतर्गत वाद सुरु होता. गेल्यावेळी झालेल्या सर्वसाधारण सभेपूर्वी प्रदेश काँग्रेस कमिटीने या तीन पदासांठी लियाकत अली अन्सारी, बंडू पाचलिंग व मेहराज कुरेशी या तिघांची नावे निश्चित केली होती. त्यानुसार काँग्रेसचे गटनेते भगवान वाघमारे यांनी तिघांचा अर्जही दाखल केला होता. परंतु, काँग्रेसमधील बहुतांश नगरसेवकांनी लियाकत अली अन्सारी यांच्या नावाला विरोध दर्शविला होता. मनपा आयुक्त राहुल रेखावार सभागृहात उशिरा आल्याचे कारण पुढे करुन ती सर्वसाधारणसभा तहकूब करण्यात आली होती. प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेली नावे मंजूर नाहीत, त्यामुळे पदाचे राजीनामे देऊ, अशीही धमकी काही नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे दिली होती. पक्षश्रेष्ठींच्याच निर्णयाला काँग्रेसच्या अनेक स्थानिक नगरसेवकांनी आव्हान दिल्याने खळबळ उडाली होती. पक्षश्रेष्ठींनीमात्र नगरसेवकांच्या राजीनाम्याच्या धमकींना न जुमानता अन्सारी यांचा अर्ज कायम ठेवला. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांना नाईलजाने माघार घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर ४ डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे लियाकत अली अन्सारी, बंडू पाचलिंग व भाजपाचे मधुकर गव्हाणे या तिन्ही सदस्यांच्या स्वीकृत सदस्यपदाला मंजुरी देण्यात आली. सामाजिक संस्थेत पाच वर्षे काम केल्याचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र जोडले नसल्याने काँग्रेसचे मेहराज कुरेशी यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे आता नवीन सदस्य निवडीसाठी पुन्हा एकदा मनपाला अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवावी लागणार आहे. या एका जागेसाठी फारसा वाद होण्याची शक्यता कमीच आहे.
दरम्यान, गव्हाणे यांच्या निवडीनंतर भाजपातीलही वाद आता संपुष्टात आला आहे. भाजपाच्या या एका स्वीकृत सदस्य पदावरुन पक्षाचे नगरसेवक मोकिंद खिल्लारे यांचे गटनेतेपद गेले. माजी नगरसेवक तथा पक्षाचे जुने कार्यकर्ते दिलीप ठाकूर यांची हकालपट्टी केली गेली. विशेष म्हणजे ठाकूर यांची यापदासाठी निवड झाल्याने सत्कारही झाले अन् त्यांना पक्षातून बाहेर काढले गेले. ही एक ठाकूर यांच्यासाठी शोकांतिका म्हणावी लागेल.