परभणी मनपा: आता बांधकाम परवानाही आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:47 AM2018-07-27T00:47:51+5:302018-07-27T00:49:15+5:30
महापालिकेतून दिले जाणारे बांधकाम परवाने १ आॅगस्टपासून आॅनलाईन होणार असून या प्रणालीसाठी शासनाने आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवाना देण्यासाठी एक पोर्टलही तयार केले आहे. निवृत्त नगररचनाकार श्रीकांत कुलकर्णी यांची या प्रकल्पावर मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: महापालिकेतून दिले जाणारे बांधकाम परवाने १ आॅगस्टपासून आॅनलाईन होणार असून या प्रणालीसाठी शासनाने आॅनलाईन पद्धतीने बांधकाम परवाना देण्यासाठी एक पोर्टलही तयार केले आहे. निवृत्त नगररचनाकार श्रीकांत कुलकर्णी यांची या प्रकल्पावर मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
२४ जुलै रोजी श्रीकांत कुलकर्णी यांनी परभणी यांनी बांधकाम वास्तूविशारदांची बैठक घेतली. यावेळी त्यांनी आॅनलाईन बांधकाम परवानगीविषयी मार्गदर्शन केले. शहरातील आर्किटेक्ट इंजिनिअरने महापालिकेत आॅनलाईन फॉर्म भरावेत, आपले सरकार या पोर्टलवर बांधकाम परवानगी या संदर्भात नोंदणी करुन घ्यावी. यापुढे शहरातील नागरिकांनाही आॅनलाईन बांधकाम परवानगी दिली जाणार असल्याने या प्रक्रियेची माहिती आर्किटेक्टंना देण्यात आली. आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी नागरिकांनी अर्ज केल्यास ३० दिवसांत त्यांना बांधकाम परवानगी मिळणार आहे. तसेच बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र ४५ दिवसात देण्यात येईल. या पद्धतीत नागरिकांना प्रत्यक्ष आपली फाईल हे देखील पाहता येईल. तसेच आसपासच्या बांधकामांची माहितीही वेबसाईटवर मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पुरुषोत्तम गोरेगावकर यांनी प्रास्ताविक केले. नगररचनाकार शिवाजी जाधव यांनी आॅनलाईन बांधकाम परवान्यासाठी आर्किटेक्ट इंजिनिअर्संनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. रईस खान यांनी आभार मानले.