परभणी मनपा : आठ सभापती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:59 PM2018-06-18T23:59:53+5:302018-06-18T23:59:53+5:30
हापालिकेतील ६ विषय समित्या आणि २ प्रभाग समितींच्या सभापतीपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने ही सभापतीपदे बिनविरोध झाली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या निवडींवर शिक्कामोर्तब होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिकेतील ६ विषय समित्या आणि २ प्रभाग समितींच्या सभापतीपदांसाठी प्रत्येकी एक अर्ज आल्याने ही सभापतीपदे बिनविरोध झाली असून मंगळवारी सकाळी १० वाजता या निवडींवर शिक्कामोर्तब होणार आहे.
महापालिकेतील ७ विषय समित्यांसह ३ प्रभाग समिती सभापतींच्या निवडी वर्षभरापासून रखडल्या होत्या. विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी ८ दिवसांपूर्वी सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर केला. १८ जून रोजी सभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यात शहर सुधार समिती सभापतीसाठी राष्ट्रवादीच्या नाजेमा बेगम शेख रहीम, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदासाठी काँग्रेसच्या वैशाली विनोद कदम, स्थापत्य समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या शेख समीना अहमद, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापतीपदासाठी शिवसेनेचे प्रशास ठाकूर, माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समितीसाठी काँग्रेसचे अ.कलीम अ.समद आणि गलिच्छ वस्ती घर बांधणी व समाजकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी काँग्रेसचे नागेश सोनपसारे यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे या निवडी बिनविरोध होणार आहेत. तीन प्रभाग समितीच्या सभापतींपैकी प्रभाग समिती अ साठी राष्ट्रवादीच्या अमरिका बेगम अ.समद आणि प्रभाग समिती ब साठी काँग्रेसच्या खमीसा जान महमद जानू यांचे एकमेव अर्ज आल्याने या दोन्ही जागा बिनविरोध होणार आहेत.
दोन जागांसाठी लढत
सभापतीपदांच्या दोन जागांसाठी प्रत्येकी दोन अर्ज आल्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे. विधी व महसूलवाढ समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे अमोल पाथरीकर व अॅड. विष्णू नवले हे दोन अर्ज आले आहेत. तर प्रभाग समिती क च्या सभापतीपदासाठी भाजपाच्या उषा झांबड आणि काँग्रेसच्या महेमुद खान मजीद खान यांचे अर्ज आल्याने या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.