महात्मा गांधींच्या विचारधारेवर काम करण्याची मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ; ६०० कर्मचाऱ्यांनी परिधान केल्या गांधी टोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2022 11:25 AM2022-08-15T11:25:57+5:302022-08-15T11:26:12+5:30
परभणी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सोमवारी सकाळी ध्वजारोहण सोहळा पार पडला.
परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त परभणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आगळे वेगळ्या पद्धतीने ध्वजारोहण साजरे केले. अधिकाऱ्यांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच माजी महापौर, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष यांनी अशा एकूण ६०० जणांनी गांधी टोपी परिधान करून ध्वजवंदन केले. यासह ध्वजारोहणादरम्यान महात्मा गांधी यांच्या विचारधारेवर शासकीय काम करण्याची शपथ सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञेतुन घेतली.
परभणी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर सोमवारी सकाळी ध्वजारोहण सोहळा पार पडला. याप्रसंगी आयुक्त देविदास पवार, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त मनोज गगड, माजी महापौर प्रताप देशमुख, यांच्यासह माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने शहरातील कल्याण मंडपम येथे फाळणी चित्र प्रदर्शन आणि पोर्ट्रेट रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे.
चार बाय सहा या आकारात जवळपास ४२ पोर्ट्रेट रांगोळीचे सादरीकरण करण्यात आले आहे. या रांगोळी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध महापुरुषांचे पुतळे तसेच शासकीय कार्यालय येथेही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विद्युत रोषणाई आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले.
गांधी टोपीने वेधले लक्ष
महापालिकेत कायमस्वरूपी तसेच कंत्राटी मिळून जवळपास ६०० कर्मचारी आहेत. या ६०० कर्मचाऱ्यांसाठी मनपा प्रशासनाने ध्वजवंदन सोहळ्याकरिता गांधी टोपी खरेदी केली. या गांधी टोपी परिधान करून कर्मचाऱ्यांनी ध्वजवंदनात सहभाग घेतला. त्यामुळे शहरातील विविध कार्यालयांमध्ये झालेल्या ध्वजवंदन सोहळ्यापेक्षा येथील विविधता सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सर्वसामान्य नागरिकांची पडणारी कामे आणि त्यांच्यासोबत करावयाचे वर्तन यासाठी कर्मचाऱ्यांनी महात्मा गांधीजींच्या प्रतिज्ञा नुसार सर्वांशी व्यवहार ठेवावा, अशी शपथ देण्यात आली.