परभणी : तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:02 AM2018-05-21T00:02:53+5:302018-05-21T00:02:53+5:30
देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा गोदावरीपात्रात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन २० मे रोजी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पूर्णा : देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा गोदावरीपात्रात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन २० मे रोजी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
नांदेड जिल्ह्यातील मेंढला (ता.अर्धापूर) येथील नारायण शंकरराव वानखेडे हे १५ मे रोजी पूर्णा तालुक्यातील गंगाजी बापु देवस्थान येथे गावातील तिघांसमवेत दर्शनासाठी आले होते. दोन दिवस उलटूनही नारायण वानखेडे हे घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. १७ मे रोजी सातेफळ नदी परिसरातील गोदावरी नदीपात्रात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी चुडावा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली होती. घटनेच्या तीन दिवसानंतर मयताची पत्नी सुनिता नारायण वानखेडे यांनी रविवारी चुडावा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.
गावातील माधव बालाजी वानखेडे, गजानन राजू नवले व देविदास नवले या तिघांनी संगनमत करुन आपल्या पतीस गंगाजीबापू येथे आणून त्यांच्या खिशातील ८ हजार रुपये बळजबरीने काढून घेतले व गोदावरी नदीपात्रात बुडवून त्यांना जीवे मारले, असे या तक्रारीत म्हटले आहे. त्यावरुन चुडावा पोलिसांनी तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मीना कर्डक, हेड कॉन्स्टेबल भारत सावंत, वाघमारे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.