परभणी: स्वच्छ सर्वेक्षणात मनपाची ढिसाळ कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:53 PM2019-03-06T23:53:42+5:302019-03-06T23:54:26+5:30
केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गतवर्षी जलद प्रतिसादाबद्दल देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या परभणी महानगरपालिकेची यावर्षी अत्यंत सुमार कामगिरी झाली असून, देशातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत परभणीचे नावच आलेले नाही़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गतवर्षी जलद प्रतिसादाबद्दल देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या परभणी महानगरपालिकेची यावर्षी अत्यंत सुमार कामगिरी झाली असून, देशातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत परभणीचे नावच आलेले नाही़
केंद्र शासनाने देशभरात नागरी भागासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले होते़ ४ ते ३० जानेवारी या काळात केंद्रस्तरीय पथकाने शहरांना भेटी देऊन या अभियानातील कामांची पाहणी करीत गुणांकन केले होते़ बुधवारी दिल्ली येथे देशातील शहरांचे चार विभागात गुणांकन जाहीर करण्यात आले़ यातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत परभणी शहराचे नावच नाही़ त्यामुळे परभणी महानगरपालिकेची स्वच्छता अभियानातील यावर्षीची कामगिरी सुमार झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे़ गतवर्षी या अभियानात जलद प्रतिसाद गटात परभणी महानगरपालिकेला देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते़
त्यामुळे यावर्षी देखील मनपा या अभियानातील कामगिरीत सातत्य ठेवेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, प्रशासकीय यंत्रणेतील उदासिनता, राजकीय हस्तक्षेप यामुळे मनपाला स्वच्छता अभियानात चांगली कामगिरी करता आली नाही़ परिणामी या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकाला मनपाचे काम प्रभावित करू शकले नाही़
परिणामी बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालातून परभणी गायब झाली आहे़ परभणी महानगरपालिकेने किमान ८० ते ९० टक्के गुण जरी मिळविले असते तरी या यादीत शहराचे नाव आले असते; परंतु, मनपाला जवळपास ५० ते ५५ टक्केच गुण मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजली़
अनुदान उचलले पण शौचालय बांधकाम नाही
परभणी महानगरपालिकेने वैयक्तीक शौचालय उभारण्यासाठी अनेक लाभार्थ्यांना अनुदान दिले; परंतु, बऱ्याच लाभार्थ्यांनी वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम न करताच अनुदानाची रक्कम हडप केली़ ही बाब पथकाच्या निदर्शनास आली़ विशेष म्हणजे मनपातील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनाही या संदर्भात माहिती असूनही कारवाई झालेली नाही़ लाभार्थ्यांना जी अनुदानाची रक्कम देण्यात आली, त्यातच मुळात गौडबंगाल असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे़ त्यामुळे या प्रकरणी त्रयस्त यंत्रणेकडून चौकशी केल्यास काही राजकीय मोहरे यातून उघडे पडू शकतात़
गंगाखेड पालिका देशात ५२ व्या स्थानावर
दरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पश्चिम विभागामधून परभणी जिल्ह्यातून गंगाखेड नगरपालिकेने ५२ वा क्रमांक मिळविला आहे़ सेलू नगरपालिकेने ३१८७़२० गुण घेऊन ६२ वा, पाथरी नगरपालिकेने ३०८६़९५ गुण घेऊन ८२ वा क्रमांक मिळविला आहे़ तर जिंतूर नगरपालिका २८७८़७९ गुण घेऊन १४६ व्या क्रमांकावर आहे़ मानवत नगरपालिका २७२७़५९ गुणांसह २२४ व्या, पालम नगरपंचायत २५०४़४८ गुणांसह ३४६ व्या, पूर्णा नगरपालिका २४५८़८९ गुणांसह ३६९ व्या आणि सोनपेठ नगरपालिका विभागात ४३३ क्रमांकावर आहे़ या नगरपालिकेला २३४९़१० गुण मिळाले आहेत़ पश्चिम विभागातून हा रँक जाहीर करण्यात आला असून, या विभागात राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या पाच राज्यांचा समावेश आहे़