परभणी :राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला मुहूर्त; २७ कोटींच्या निविदा मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2018 12:51 AM2018-09-02T00:51:18+5:302018-09-02T00:51:29+5:30
जिल्ह्यातील कोल्हापाटी ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग २२२ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागाला असून, या कामासाठीच्या २७ कोटी रुपयांच्या निविदांना शुक्रवारी प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली. येत्या चार दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यातील कोल्हापाटी ते झिरोफाटा या राष्ट्रीय महामार्ग २२२ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त लागाला असून, या कामासाठीच्या २७ कोटी रुपयांच्या निविदांना शुक्रवारी प्रत्यक्ष मंजुरी देण्यात आली. येत्या चार दिवसांमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी माहिती या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड यांनी दिली.
कल्याण- नगर- परभणी-नांदेड- निर्मल या राष्ट्रीय महामार्ग २२२ चे परभणी जिल्ह्यात कोल्हा पाटीपर्यंत काम पूर्ण झाले आहे. त्यापुढे कोल्हापाटी ते नसरतपूर या रस्ता कामाच्या २८१ कोटी ७८ लाख रुपयांच्या निविदेला १ आॅगस्ट २०१६ रोजी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. हे काम मुंबई येथील मे. गॅनॉन डॅनकरले या कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर २० डिसेंबर २०१६ रोजी या कामाबाबत संबंधित कंपनीसोबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने करार केला होता. त्यानंतर २८ जून २०१७, २८ नोव्हेंबर २०१७, ९ डिसेंबर २०१७, ११ डिसेंबर २०१७ असा वारंवार कंपनीसोबत विविध कारणांनी पत्र व्यवहार करण्यात आला; परंतु, प्रत्यक्ष या रस्ताकामाला सुरुवातच झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड यांनी पुन्हा सदरील कंपनीला १३ डिसेंबर २०१७ रोजी काम समाप्त करण्याची नोटीस बजावली. या संदर्भात १५ दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश कंपनीला देण्यात आले होते; परंतु, त्यालाही या कंपनीने दाद दिलेली नाही. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर १९ एप्रिल २०१८ रोजी परभणी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रस्ता कामाचे ई-भूमिपूजनही करण्यात आले होते. तरीही या कंपनीने या कामाला प्रारंभ केला नाही. दुसरीकडे या रस्त्यावर खड्ड्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात ओरड होऊ लागली. त्यानंतर आ. बाबाजानी दुर्राणी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून या रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. तसेच बांधकाम विभाग सदरील कंत्राटदाराला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणने सदरील रस्त्याचे काम मुंबईतील कंत्राटदाराकडून पूर्ण करुन घेण्याऐवजी तात्पुरत्या स्वरुपात निविदा मागवून काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात माहिती देताना या विभागाचे कार्यकारी अभियंता मिठेवाड म्हणाले की, कोल्हापाटी ते झिरोफाटा (परभणी शहर परिसर वगळून) या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी ७० लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. शुक्रवारी ही निविदा उघडण्यात आली. त्यानुसार कंत्राटदारामार्फत खड्डे बुजविण्याचे काम येत्या चार दिवसांमध्ये सुरु होणार आहे. परभणी शहर व परिसरातील १४ कि.मी. रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. या कामाच्या निविदांचीही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या कामालाही येत्या चार दिवसांत सुरुवात होईल, असे मिठेवाड म्हणाले.
कामाच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज
कोल्हापाटी ते झिरोफाटा या परभणी शहर परिसर वगळता असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले असले तरी संबंधित काम हे दर्जेदार व्हावे, याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने लक्ष देणे गरजेचे आहे. शिवाय परभणी शहर परिसरातील १४ कि.मी.अंतराच्या कामासाठी तब्बल २६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हे काम परभणी जिल्ह्यातीलच कंत्राटदाराला देण्यात आले आहे. परभणीतील काही कंत्राटदारांना समाधानकारक काम केले नसल्याने महानगरपालिकेने काळ्या यादीत टाकले होते. हा अनुभव पाहता या कामावर प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष ठेवण्याची देण्याची गरज आहे. शिवाय या कामाची वेळोवेळी गुणवत्ता निरिक्षण विभागाकडून तपासणी होणे आवश्यक आहे, असे जिल्हावासियांचे मत आहे.